
जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत सोमवारी मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. या दुर्घटनेत एका पाच वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. बैंच-कलसैन परिसरातील प्राथमिक शाळेत ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भूस्खलनामुळे शाळेच्या छतावर एक मोठा दगड कोसळला, यात विद्यार्थी जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून अन्य चार विद्यार्थी आणि एक शिक्षक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी पूंछ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एहसान अली असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तर मोहम्मद सफीर (7), बिलाल फारूख (8), आफताब अहमद (7) आणि तोबिया कौसर (7) अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत.