Jammu Kashmir – सुरक्षा दलांकडून सलग पाचव्या दिवशी कुलगाममध्ये शोध मोहीम सुरू, 4 ते 5 दहशतवादी लपल्याची माहिती

जम्मू-कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी दहशतवादीविरोधी मोहीम सुरू आहे. अखल येथील जंगलात सुरक्षा दलांकडून शुक्रवारपासून शोध मोहीम सुरू आहे. आतापर्यंत सुरक्षादलांनी तीन नक्षलदवाद्यांना ठार केले असून गोळीबारात सहा जवानही जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर आर्मी रुग्णालयात दाखल उपचार सुरू आहेत. अखलच्या जंगलात आणखी 4 ते 5 दहशतवादी लपले असल्याने सुरक्षा दलाकडून अद्याप शोध मोहीम सुरू आहे.

हिंदुस्थानी लष्कर, जम्मू कश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाकडून अखलच्या जंगलात शोध मोहीम सुरू आहे. घनदाट जंगले आणि डोंगराळ प्रदेशामुळे दहशतवाद्यांचे अचूक ठिकाण शोधण्यात अडचणी येत आहेत. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सैन्य हल्ला करणाऱ्या हेलिकॉप्टरचा वापर करत आहे. याशिवाय नवीन तंत्रज्ञानाचे ड्रोन देखील वापरले जात आहेत.

सुरक्षा दल हायटेक सर्विलान्स सिस्टम, ड्रोन, हेलिकॉप्टर आणि पॅरा कमांडोच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. सर्व दहशतवादी पकडले जात नाहीत किंवा त्यांचा खात्मा केला जात नाही तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. लष्कराने स्थानिक लोकांना चकमकीच्या ठिकाणापासून दूर राहण्याचे आणि सुरक्षा दलांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.