
पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू असल्याने हिंदुस्थानच्या चिंतेत वाढ झाली आहे. गोळीबाराच्या घटनांमुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ तणाव वाढला आहे. गेल्या दहा दिवसांत पीर पंजाल प्रदेशाच्या दक्षिणेकडील नियंत्रण रेषेवर (एलओसी) गोळीबाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (बीएटी) कडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचे प्रयत्न, गोळीबारच्या घटना घडत आहेत.
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी करार असताना देखील स्थानिक पातळीवर या कराराचे उल्लंघन होत असल्याचे हिंदुस्थानी लष्करातील सूत्रांनी सांगितले. लष्कराच्या सूत्रांनुसार, जम्मू आणि काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये घुसखोरीचे अनेक प्रयत्न हाणून पाडण्यात आले आहेत. हिंदुस्थानी लष्कर अधिक सतर्क झाले असून शत्रूच्या कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे.
गेल्या आठवड्यात देखील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार आणि स्फोट घडवले. याला हिदुस्थानी सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले. व्हाईट नाईट कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) लेफ्टनंट जनरल नवीन सचदेवा यांनी रियासी आणि राजौरी सेक्टरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला.
जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी युद्धबंदी उल्लंघनांवर हिंदुस्थानाच्या ठाम भूमिकेबाबत पुनरुच्चार केला. हिंदुस्थानी लष्कर शस्त्रसंधी उल्लंघनाला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. त्यांनी सीमापार दहशतवादाचा सामना करण्यासाठी सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांमधील समन्वित प्रयत्नांवर भर दिला. तसेच प्रदेशात शांतता राखणे ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे प्रतिपादन केले.