
खार येथील जान्हवी कुकरेजा हिच्या हत्ये प्रकरणी सहआरोपी व तिची मैत्रीण दिया पडळकर हिची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून तिच्या सुटकेला जान्हवीच्या आईने हायकोर्टात आव्हान दिले आहे.
पाच वर्षांपूर्वी खार येथील भगवती हाइट्स या इमारतीच्या गच्चीवर नववर्षाच्या पूर्वसंध्येला पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जान्हवी हिला तिचा प्रियकर श्री जोगधनकर याने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत जान्हवीचा मृत्यू झाला. जान्हवीची मैत्रीण दिया हिने श्री याला साथ दिली. याप्रकरणी सत्र न्यायालयाने जोगधनकरला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर पुराव्याअभावी दिया हिला निर्दोष सोडले. फॉरेन्सिक पुरावे असतानाही न्यायालयाने दिया हिला निर्दोष सोडल्याने जान्हवीची आई निधी कुकरेजा यांनी हायकोर्टात ऍड. त्रिवनकुमार करनानी यांच्यामार्फत याचिका दाखल केली. न्यायालयाने आरोपीची घटनास्थळी उपस्थिती मान्य करूनही गुह्यातील तिच्या सहभागाकडे दुर्लक्ष केले. पुरावे असतानाही न्यायालयाने दियाची निर्दोष सुटका केली. यामध्ये सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि घटनास्थळी मिळालेल्या पडळकरच्या वस्तूंचा उल्लेख आहे. फॉरेन्सिक अहवालानुसार, दिया ज्या पलंगावर झोपली होती, तेथील उशा आणि चादरीवर जान्हवीचे रक्त आढळले होते असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.


























































