जनशताब्दी एक डबा सोडून पळाली, बुकिंग केलेल्या प्रवाशांची तारांबळ

कोकणात जाण्यासाठी सर्वाधिक पसंती असलेली जनशताब्दी एक्स्प्रेस आज एक डबा सोडून मार्गस्थ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे संबंधित डब्यात कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली. रेल्वे प्रशासनाने या सर्व तिकीटधारक प्रवाशांना दुसऱया डब्यांत शिफ्ट केले, मात्र या प्रकाराबद्दल प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

मध्य रेल्वेची 12051 जनशताब्दी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव एक्स्प्रेस नेहमीप्रमाणे सुटली. पहाटे 5 वाजता सुटणारी ही गाडी सायंकाळी 4.40 वाजता मडगावमध्ये पोहोचते. या गाडीच्या आरक्षित असलेला डीएल-1 हा डबा जोडलाच गेला नसल्याने प्लॅटफॉर्मवरच राहिला. यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली.  हा डबा राखीव आणि वातानुकूलित असून त्याला जोडून सामानाचा डबा होता. मात्र हा डबाच नसल्याने प्रवाशांनी तिकीट तपासनीसाला धारेवर धरीत सीट देण्याची मागणी केली. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडेही तक्रार केली. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे डबा जोडला गेला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

मध्य रेल्वेचा निष्काळजीपणा

जनशताब्दी गाडीच्या नियोजनाची जबाबदारी मध्य रेल्वे प्रशासनाची आहे. यामध्ये डीएल -1 या डब्यात तांत्रिक बिघाड झाल्याने हा डबा जोडला नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र याबाबत आरक्षण केलेल्या प्रवाशांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. शिवाय पर्यायी डबाही जोडण्यात आला नाही. त्यामुळे मध्य रेल्वेच्या निष्काळजीपणाविरोधात प्रवाशांनी संताप व्यक्त केला.