टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीचा ‘कणा’ मोडला; जसप्रीत बुमराह पाचव्या कसोटीतून बाहेर, कुणाला मिळणार संधी?

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना 31 जुलैपासून ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. यजमान इंग्लंडचा संघ या मालिकेत 2-1 असा आघाडीवर आहे. त्यामुळे पाचवा कसोटी सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न हिंदुस्थानचा असणार आहे. मात्र याआधीच हिंदुस्थानच्या संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत.

हिंदुस्थानच्या वेगवान माऱ्याचा कणा समजला जाणारा गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी लढतीतून बाहेर गेला आहे. वर्कलोडमुळे बुमराहला विश्रांती दिली जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. बुमराह आधी स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा देखील पायाला झालेल्या दुखापतीमुळे पाचव्या कसोटीला मुकणार आहे. त्यामुळे या दोन अनुभवी खेळाडूंशिवाय हिंदुस्थानला निर्णायक लढतीत मैदानात उतरावे लागणार आहे. ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ने याबाबत वृत्त दिले आहे.

ओव्हलवर हिंदुस्थानी फलंदाजांचा बोलबाला, गावसकरांपासून कोहलीपर्यंत अनेक दिग्गजांच्या संस्मरणीय खेळय़ांचा नजराणा

बीसीसीआयच्या मेडिकल पथकाने वर्कलोड मॅनेजमेंटमुळे जसप्रीत बुमराह याला पाचव्या कसोटीत विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. त्या दुखापतीचा विचार करता बुमराहचे वर्कलोड मॅनेज करणे आवश्यक आहे. तरच तो बराच काळ तंदुरुस्त राहील, असे मेडिकल पथकाचे मत आहे. विशेष म्हणजे इंग्लंडविरुद्ध मालिका सुरू होण्याआधीही मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी बुमराह तीन कसोटी सामने खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते.

तीन लढतीत 14 विकेट्स

इंग्लंडविरुद्ध जसप्रीत बुमराह याने 3 सामने खेळले असून यात त्याने 14 विकेट्स घेतल्या आहेत. दोन वेळा त्याने एका डावात 5 विकेट घेण्याचा कारनामा केला. मात्र या मालिकेत मोक्याच्या क्षणी त्याला विकेट मिळालेल्या नाहीत. तसेच बुमराह संघात नसताना हिंदुस्थानच्या विजयाची टक्केवारी जास्त असल्याचेही समोर आले होते. त्यामुळे त्याच्या जागी आता संघात कुणाची वर्णी लागते याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

तीन बदल अपेक्षित

दरम्यान, पाचव्या कसोटीसाठी हिंदुस्थानच्या संघात तीन बदल अपेक्षित आहेत. ऋषभ पंतच्या जागी ध्रुव जुरेल, जसप्रीत बुमराहच्या जागी आकाश दीप आणि अंशुल कंबोजच्या जागी फिरकीपटू कुलदीप यादवला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. अर्थात खेळपट्टीचा नूर पाहूनच अंतिम 11 चा संघ निवडला जाईल.

…तर पर्यायी खेळाडू मिळायला हवा! कसोटीत मेडिकल सब्स्टिट्यूट नियमाला गंभीरचा पाठिंबा तर बेन स्टोक्सचा विरोध