India Pakistan War मुंबईकर जवान मुरली नाईक पाकिस्तानशी लढताना शहीद

पाकिस्तानने शुक्रवारी पहाटे हिंदुस्थानच्या सीमावर्ती भागांमध्ये ड्रोन हल्ले केले. त्यात जम्मू-कश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये घाटकोपरचे 23 वर्षीय जवान मुरली नाईक यांना वीरमरण आले आहे. मुरली नाईक यांच्या पार्थिवावर उद्या शनिवारी आंध्र प्रदेशातील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यात आज पहाटे 3.30 वाजता मुरली नाईक शहीद झाले. हे वृत्त समजताच घाटकोपर परिसरात शोककळा पसरली. त्याचवेळी त्यांच्या शौर्याबद्दल अभिमानही व्यक्त झाला. आंध्र प्रदेशातील सत्यसाईनगर जिह्यातील कफीदांडा हे त्यांचे मूळगाव. घाटकोपरच्या कामराज नगरात मुरली नाईक हे वडील श्रीराम व आई ज्योती यांच्यासह वास्तव्यास होते.

एकुलता एक

मुरली हे आईवडिलांचे एकुलते एक होते. आईवडिलांनी बरेच कष्ट करून त्यांना शिकवून मोठे केले होते. त्यांची आई घरकाम करते, वडील बिगारीचे काम करतात. ते यात्रेसाठी आंध्र प्रदेशातील मूळ गावी गेले असतानाच ही दुःखद बातमी त्यांना समजली. मुरली यांच्या निधनाची बातमी येताच आईने हंबरडा फोडला.

मुरली यांचे पार्थीव उद्या मूळगावी नेले जाणार आहे

2022 मध्ये मुरली नाईक लष्करात भरती झाले होते. नाशिकच्या देवळालीत प्रशिक्षण घेतल्यानंतर आसाम येथे त्यांची पहिली पोस्टिंग झाली होती. तेथून त्यांना पंजाब येथे नियुक्ती मिळाली होती. दरम्यान, सीमेवरील तणावामुळे मुरली यांना पंजाबहून जम्मू-कश्मीरच्या उरी येथे कर्तव्यावर पाठविण्यात आले होते.