राष्ट्रवादी पक्ष एकत्र करायची अजित दादांची इच्छा होती – जयंत पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मागील सहा महिन्यांपासून चर्चा सुरू होती. शरद पवार यांच्या हयातीत राष्ट्रवादी पक्ष एकत्र करायचा अशी अजितदादांची मनोमन इच्छा होती. शरद पवारांनी याबाबतची जबाबदारी माझ्याकडे दिली होती, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

बारामतीला जी सर्व नेत्यांची बैठक झाली त्यासाठी आधी आम्ही विमानाने जाणार होतो. पण बारामतीच्या धावपट्टीवर विमान उतरेल असे विमान मिळाले नाही. 12 फेब्रुवारीला एकत्र करण्याबाबतची तारीख ठरली होती. दोन्ही पक्ष आधी एकत्रित करायचे, मग नंतर बाकीचे निर्णय घ्यायचे असे अजितदादांच्या मनात होते. या चर्चांमध्ये सुप्रिया सुळे यांना आवर्जून घेतलं होतं, असे जयंत पाटील म्हणाले.

तटकरे, प्रफुल्ल पटेल, भुजबळ यांना पूर्वकल्पना

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत बऱ्यापैकी चर्चा पुढे गेलेली होती. अजितदादा यांनी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि पक्षातील अन्य आमदारांनादेखील याची त्यांना कल्पना दिलेली आहे. हे त्यांनी आम्हाला स्पष्टपणाने सांगितलं होतं. अजितदादांचं असं मत होतं की, मी जेव्हा निर्णय सांगतो तेव्हा तुम्ही चिंता करायची गरज नाही. हे सगळे माझे जे सहकारी आहेत ते मी म्हणेन त्याप्रमाणे निर्णय घेतील, असं दादांनी म्हटल्याचंही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

आठ ते दहा वेळा बैठका झाल्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात असा अजित पवारांचा आग्रह होता. त्यासाठी जवळपास आठ ते दहा वेळा बैठका झाल्या होत्या, बैठकीचे ठिकाण माझं घरच होतं. माझ्याकडे येऊन बऱ्याच वेळेला ते बोलत होते. जे झालं ते सगळं विसरू आणि गेल्या दोन अडीच वर्षांचा कालखंड मागे टाकून आपण सगळे एक होऊ आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंध करू ही त्यांची भूमिका होती, असे जयंत पाटील म्हणाले.

एकत्र येण्याच्या मुद्दय़ाला पटेल आणि तटकरेंकडून बगल

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची घोषणा 12 फेब्रुवारीला होणार होती असे स्पष्ट केले, मात्र अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी याबाबतच्या प्रश्नावर थेट उत्तर देण्याचे टाळत या मुद्दय़ाला बगल दिली आहे. यामुळे अजित पवार गटात संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील बैठकीचा व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबाबत तटकरे म्हणाले, हा व्हिडीओ समोर आला आहे तो बारामती इथं झालेल्या कृषी प्रदर्शनाच्या दिवशीचा आहे. या बैठकीत फक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका एकत्र लढवण्याबाबत चर्चा झाली होती. सदर बैठकीत विलीनीकरणावर चर्चा झाली नसल्याचे तटकरे यांनी सांगितले. दरम्यान विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मात्र राष्ट्रवादीचं विलीनीकरण व्हावं, अशी अजितदादांची इच्छा होती याबाबत तटकरे आणि पटेल यांनाच माहिती असावी असे सांगितले.

म्हणून पार्थ पवार शपथविधीला गैरहजर

पार्थ पवार यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप असून, सध्या त्यासंदर्भात चौकशी सुरू आहे. त्यामुळे ते शपथविधीला हजर राहिल्यास भाजपच्या प्रतिमेला धक्का बसेल म्हणून पार्थ पवार यांना शपथविधी समारंभापासून दूर ठेवल्याची चर्चा आहे.

पार्थ पवार यांनी घेतली शरद पवार यांची भेट

पार्थ पवार यांनी शरद पवार यांची गोविंद बाग येथील निवासस्थानी भेट घेऊन जवळपास 30 ते 35 मिनिटे चर्चा केली. या भेटीनंतर पार्थ पवार यांनी सुनेत्रा पवारांशी फोनवरून चर्चा करत भेटीचा तपशील दिला. पार्थ पवार राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा आहे.

सुप्रिया सुळे अजितदादांच्या आईंना भेटल्या

मुंबईत सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची सर्व प्रक्रिया सुरू असताना सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या बारामतीतील घरी त्यांची आई आशाताईंची भेट घेतली. आशाताईंची विचारपूस केल्यानंतर सुप्रिया सुळे या तातडीने दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाल्या.