झुंड चित्रपटातील बाबूचा खून, नागपुरात खळबळ

नागराज मंजूळे दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन  मुख्य भूमिकेत असलेल्या झुंड चित्रपटातील प्रियांशू क्षत्रिय ऊर्फ बाबू छत्री याचा खून झाला आहे. बाबू हा कुख्यात गुन्हेगार होता. त्यावर चोरी आणि इतर असे अनेक गुन्हे दाखल होते. मंगळवारी रात्री बाबू जखमी अवस्थेत आढळला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हा संपूर्ण प्रकार नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, बाबू छत्री याला तारांनी बांधून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. त्याच्यावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयाच्या आधारावर ध्रुव लालबहादुर साहू या संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलिस जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा बाबू छत्री अर्धनग्न अवस्थेत आढळला. त्याच्या शरीरावर प्लास्टिकच्या तारा गुंडाळलेल्या होत्या. स्थानिक लोकांना आरडाओरडा ऐकू आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्याला मेयो रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तपासणीदरम्यान त्याला मृत घोषित केले.

बाबू छत्री हा मेकोसाबाग येथील रहिवासी होता, तर अटक केलेला आरोपी ध्रुव साहू हा नारा परिसरात राहतो. दोघांवरही यापूर्वी चोरी आणि मारहाणीचे अनेक गुन्हे नोंद आहेत.