
लंडनच्या व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत असा प्रचार करत ती महाराष्ट्रात आणू पाहणाऱ्या मिंधे सरकारच्या खोटेपणा समोर आला आहे. खुद्द म्युझियमनेच ती छत्रपतींनी वापरलेली आहेत की नाही याबाबत अनिश्चितता असल्याचे स्पष्ट केले आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी त्यासंदर्भात केलेल्या पत्रव्यवहारात म्युझियमकडून ही माहिती देण्यात आली आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मिंधे सरकारला फटाकरले आहे.
”अफझलखानाचे पोट फाडताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आम्ही आणणार, असा गाजावाजा या सरकारने केला होता. इंग्लंडमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ही वाघनखे आहेत असा दावाही केला होता. त्याचवेळेस आम्ही सांगितले होते की त्या वाघनखांची खरी माहिती कोणालाच नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली हीच वाघनखे आहेत, असे म्हणता येणार नाही. पण, भावनिक राजकारण करून लोकांना आपल्याकडे वळविण्याची सवय असल्याने ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरली होती’ अशी घोषणा सरकारनेच करून टाकली. आता व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या व्यवस्थापनाने पत्र लिहून, ज्येष्ठ इतिहास संशोधक तथा इतिहासकार इंद्रजित सावंत यांना कळविले आहे की, ‘म्युझियममध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही अन् तसे आम्ही कधी सांगितलेलेही नाही’ म्हणजेच भावनिक राजकारण करता करता ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्रास्रांविषयी खोटी माहिती महाराष्ट्रातील तमाम श्रद्धाळू लोकांपर्यंत पोहचवित आहेत. कमीत कमी छत्रपती शिवाजी महाराजांशी तरी राजकारण करू नका” असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे.
लंडनच्या व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी मिंधे सरकारचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा गाजावाजा केला. लवकरच ती महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. परंतु ती शिवरायांची असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचे लंडनच्या म्युझियमने इंद्रजीत सावंत यांना कळवले आहे. त्यासंदर्भात आपण म्युझियमकडे पत्रव्यवहार केला होता, अशी माहिती सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
लंडनमधील ती वाघनखे शिवरायांची नाहीत याबद्दल काही पुरावेही आपण म्युझियमला दिले होते आणि ते मान्य करत म्युझियमने त्यांच्याकडील माहितीत तसे बदलही केले आहेत. ती माहिती महाराष्ट्र सरकारने प्रदर्शनाच्या ठिकाणी ठळकपणे मांडावी अशा सूचनाही म्युझियमने करार करताना दिल्या आहेत, असेही सावंत यांनी सांगितले.