
जम्मू कश्मीरच्या कुलगाममध्ये 6 आणि 7 जुलै रोजी लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. मुद्रागाम आणि चिन्नीगाम ख्रिसलमध्ये अंधाधुंद गोळीबाराची घटना घडली. चकमकीत सुरक्षा दलांनी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला. यात दोन जवानही शहीद झाले.
चकमकीनंतर लष्कराच्या शोधमोहीमेचा एक व्हिडीयो समोर आला असून व्हिडीयोत एका घराच्या लाकडी कपाटाच्या मागे बंकर बनवून चिनीगाम फ्रिसल भागात खात्मा करण्यात आलेले 6 पैकी 4 दहशतवादी लपले होते अशी माहिती उघड झाली आहे. त्यामुळे जम्मू-कश्मीरमधील दहशतवाद अंतिम टप्प्यात असल्याचा दावा करणारे एनडीए सरकार तोंडावर पडले आहे.
अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार मारले गेलेले दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित होते. त्यापैकी एक पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी संघटनेचा स्थानिक कमांडर होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दहशतवादी हल्ले होत असून दोन महिन्यात अनेकदा पोलिस आणि लष्कराच्या जवानांना हल्ल्याला तोंड द्यावे लागले आहे. असे असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर राज्यसभेत गेल्या 10 वर्षात जम्मू आणि कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात घट झाल्याचा दावा केला होता. मात्र, गेल्या 48 तासांहून अधिक काळ दहशतवादी आणि लष्कराचे जवान यांच्यात धुमश्चक्री सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दहशतवादी कारवाया वाढल्याचेच समोर आले आहे.
व्हिडीयोत नेमके काय?
एका घरात लाकडी कपाट दिसत आहे. कपाटाच्या मागे काही ड्रॉव्हर्स आहेत, ते काढल्यानंतर एक अरुंद रस्ता दिसून येतो. ही वाट थेट बंकरकडे जाते. चिनीगाम फ्रिसल भागात ठार झालेल्या 6 दहशतवाद्यांपैकी 4 दहशतवादी या बंकरमध्ये लपून बसले होते, असा दावा करण्यात आला आहे.