बॉलिवूडचा बहुचर्चित चित्रपट ‘जेएनयू: जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रकाशित झाला आहे. मात्र हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत. कारण या चित्रपटात दोन वेगवेगळ्या विचारधारांचा संघर्ष प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे शिक्षणासोबतच राजकीय चळवळींसाठी प्रसिद्ध आहे. असेच काहीसे वातावरण ‘जेएनयू: जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे. या चित्रपटामधील संवाद देखील तितकेच प्रभावी आहेत. दरम्यान या चित्रपटामध्ये मार्क्सवादी-बहुजनवादी विचारधारा विरोधात हिंदुत्ववादी विचारसरणी अशा दोन वेगवेगळ्या विचारांच्या संघटनांमध्ये सुरू असलेला संघर्ष दाखवण्यात आला आहे. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या राजकारणातील विवध पैलू या चित्रपटातून दाखवण्यात आले आहेत.
‘जेएनयू: जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विनय शर्मा यांनी केले आहे. विनय शर्मा यांनी त्यांच्या चित्रपटाबाबत थोडक्यात माहिती दिली आहे. देशाचे विभाजन करण्यासाठी देशाच्या सर्वात नाजूक समस्यांना शस्त्र म्हणून वापरण्याचे डावपेच आहेत. जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी या चित्रपटात शिक्षणाचे केंद्र हे वादांसाठीचा मंच म्हणून काम करू शकत नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटाद्वारे केल्याचे ते म्हणाले.
चित्रपटात अभिनेत्री उर्वशी रौतेला, पियुष मिश्रा, रवी किशन, सिद्धार्थ बोडके, विजय राज, रश्मी देसाई, अतुल पांडे आणि शिवज्योती राजपूत आदी कलाकार वेगववेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे या चित्रपटाचे ट्रेलर लाँच केले गेले नव्हते. दरम्यान, 21 जून 2024 रोजी थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.