
‘काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल’मध्ये गुरुवारी नियोजित केलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांचे चर्चासत्र मुंबई पोलिसांच्या सूचनेनंतर आयोजकांनी रद्द केले. या कार्यक्रमात प्रा. तेलतुंबडे यांच्या तुरुंगातील अनुभवावर आधारित पुस्तकावर चर्चा होणार होती. त्याविरोधात सोशल मीडियावर काही संघटनांनी नाराजी व्यक्त करत विरोध केला होता.
‘इनकार्सरेटेड- टेल्स फ्रॉम बिहाईंट बार्स’ असे प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या चर्चासत्राचे नाव होते. पत्रकार, लेखिका नीता कोल्हटकर त्यांच्याशी ते संवाद साधणार होते, तर सूत्रसंचालन नरेंद्र फर्नांडिस करणार होते. आयोजकांनी मंगळवारी रात्री चर्चासत्रात सहभागी होणाऱया वक्त्यांना पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे चर्चासत्र रद्द करण्यात आल्याचे कळवले.
– ‘द सेल अॅण्ड द सोल ः अ प्रिझन मेमोअर’ हे प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी कारागृहातील अनुभवांवर लिहिलेले पुस्तक आहे, ज्यामध्ये त्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणात 10 व्या क्रमांकाचे आरोपी म्हणून 31 महिन्यांच्या तुरुंगवासाचे दस्तऐवजीकरण केले आहे.



























































