स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस झाडावर आदळली, कल्याण आगारातील बसचा अपघात

काही आठवड्यांपूर्वी कल्याण आगारातील बसचे चाक निखळून अपघात झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज स्टेअरिंग रॉड तुटून बस झाडावर आदळली. या अपघातात वाहकासह सात प्रवासी जखमी झाले आहेत. कल्याण आगारातील नादुरुस्त बसमुळे प्रवासी आणि वाहक यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आज सकाळी कल्याण एसटी आगाराची बस माळशेज मार्गे आळेफाटा येथे निघाली होती. मुरबाडच्या पुढे अचानक स्टेअरिंग रॉड तुटल्याने बसवरील नियंत्रण सुटून रस्त्यावरून खाली उतरली आणि झुडपांमध्ये असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला असून वाहकासह सात प्रवासी किरकोळ जखमी झाले. सुदैवाने बस झाडावर आदळल्याने मोठा अनर्थ टळला.

देखभाल, दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह
काही आठवड्यांपूर्वीच बसचे पुढचे चाक निखळून झालेल्या अपघातानंतरही एसटी बसच्या देखभाल, दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियमित देखभाल असूनही असे अपघात का घडत आहेत? देखभाल कार्यात तडजोड केली जात आहे का, आणखी किती मोठा अपघात किंवा प्रवाशांचा बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार, असे अनेक प्रश्न प्रवासी वर्गातून उपस्थित होत आहेत.