
अर्जासह जोडण्यात येणाऱया परिशिष्टावर स्वाक्षरी केली नाही म्हणून उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आल्याने कल्याण-डोंबिवलीतील अपक्ष उमेदवाराने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने या याचिकेची दखल घेत प्रकरणावर मंगळवार, 13 जानेवारी रोजी सुनावणी ठेवली आहे.
कल्याण–डोंबिवली महापालिकेच्या ‘प्रभाग क्रमांक 2 अ’मधून अपक्ष उमेदवार म्हणून भूषण तायडे यांनी 30 डिसेंबर रोजी अर्ज दाखल केला होता. मात्र अर्जासोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्टावर तायडे यांनी स्वाक्षरी न केल्याने महापालिका निवडणूक नियम 9 नुसार याचिकाकर्त्याचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद करण्यात आला. याप्रकरणी तायडे यांनी अॅड. आशीष गबाडे, अॅड. रमेश दुबे-पाटील यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी अर्जावर स्वाक्षरी नसणे हि किरकोळ चूक असून या कारणासाठी उमेदवारी अर्ज रद्द केली जाऊ नये तसेच निवडणूक लढवणे हा वैधानिक अधिकार असून तांत्रिक कारणामुळे तो नाकारता येणार नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला. न्यायालयाने याची दखल घेत या याचिकेवर मंगळवार, 13 जानेवारी सुनावणी निश्चित केली.





























































