
हळदी समारंभाच्या जेवणात पन्नास जणांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. कल्याणच्या मोहन प्राईड या इमारतीमध्ये ही विषबाधा झाली असून त्यात वधूचाही समावेश आहे. सर्वांना उपचारासाठी विविध रुग्णालयांमध्ये दाखल केल्याने आज होणारा लग्नसोहळा रद्द करावा लागला आहे. दरम्यान कॅटरर्स राम पराते याच्याविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण पश्चिमेकडील स्नेहा बाविस्कर या तरुणीचे आज पुण्यातील अमोल खतार या तरुणाबरोबर लग्न होते. शनिवारी स्नेहाच्या घरी हळदीची तयारी सुरू होती तर हळदीसाठी आलेल्या पाहुण्यांना शाकाहारी व मांसाहारी जेवणाची सोय करण्यात आली होती. रात्री उशिरा हळदीचा कार्यक्रम आटोपून पाहुण्यासह सर्वजण झोपी गेले. मात्र पहाटेपासूनच ४० ते ५० पाहुण्यांसह वधू आणि तिच्या आईलादेखील उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले.
कामगारांनाही लागण
वधू रुग्णालयात असल्याने अखेर आज होणारा लग्न समारंभपुढे ढकलावा लागला. विषबाधेनंतर स्नेहाचे वडील संचित बाविस्कर यांनी कॅटरर्स राम पराते याच्या विरोधात खडकपाडा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या कार्यक्रमात जेवलेल्या कॅटरर्सच्या कामगारांनादेखील विषबाधा झाली असून या सर्वांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

























































