
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आपल्या पतीला गमावलेल्या प्रसन्ना राव यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल हिंदुस्थानी सैन्याचे आणि सरकारचे आभार मानले. या ऑपरेशन सिंदूरमुळे सगळ्यांच्या कुटुंबाला काही दिलासा मिळाला आहे, असंही त्या म्हणाल्या. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांचे अश्रू थांबत नव्हते.
22 एप्रिल रोजी जम्मू आणि कश्मीरच्या पहलगाममधील बैसरन येथे दहशतवाद्यांनी कामाक्षी प्रसन्ना यांचे पती मधुसूदन राव यांची गोळ्या घालून हत्या केली होती. ऑपरेशन सिंदूरच्या नावाबद्दल विचारले असता, ‘पंतप्रधान मोदींनी बदला घेण्याची जबाबदारी घेतली. यामुळे कुटुंबांना काही दिलासा मिळाला. या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले. सिंदूर म्हणजे केवळ पतीच नाही तर आम्ही आमचा जीवच गमावला आहे’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
‘आता 26 कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. हिंदुस्थानात कोणाहीसोबत असे घडू नये’, असे त्यांनी सांगितले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त जम्मू आणि कश्मीरमध्ये नऊ दहशतवादी ठिकाणांवर लष्करी हल्ले झाले तेव्हा बुधवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. या लक्ष्यांमध्ये बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तोयबाचा तळ यांचा समावेश होता.
जम्मू आणि कश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील गावांना लक्ष्य करून पाकिस्तानी सैन्याने गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. ज्यामध्ये चार मुले आणि एका सैनिकासह किमान 13 जण ठार झाले आणि 57 जण जखमी झाले. दोन्ही देशांमध्ये तणाव वाढत असून पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील काही सीमाभागातील गावांमधील लोक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होऊ लागले.
22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी सरकारने सर्वपक्षीय बैठक घेऊन ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या यशाबद्दल आणि त्यानंतरच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली आहे.
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, एस जयशंकर, जे पी नड्डा आणि निर्मला सीतारमण यांनी सरकारचे प्रतिनिधित्व केले, तर काँग्रेसकडून राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत, तृणमूल काँग्रेसचे संदीप बंदोपाध्याय आणि द्रमुकचे टी आर बालू अशा प्रमुख नेत्यांची उपस्थिती यावेळी होती.