कमला हॅरिस राष्ट्राध्यक्षपदासाठी एकदम फिट, मेडिकल रेकॉर्ड जारी करत ट्रम्प यांना दिले आव्हान

येत्या 5 नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे. निवडणुकीच्या 23 दिवस आधी डेमक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी त्यांचे मेडिकल रेकॉर्ड जारी केले. यामध्ये त्यांना पूर्णपणे तंदुरुस्त घोषित करण्यात आले.

फिटनेस रेकॉर्ड जारी करून कमला यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे त्यांचे आरोग्य रेकॉर्ड सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. कमला हॅरिस म्हणाल्या, ‘‘डोनाल्ड ट्रम्प यांना वाटतंय की, ते अध्यक्षपदासाठी योग्य आहेत की नाही हे अमेरिकन जनतेला कळू नये.’’ यावर ट्रम्प यांच्या टीमने ट्रम्प यांचे मेडिकल रेकॉर्ड जाहीर न करता एक निवेदन जारी केले. या निवेदनात ‘ट्रम्प यांची तब्येत पूर्णपणे ठीक आहे. कमला यांच्याकडे राष्ट्राध्यक्ष बनण्याची ताकद नाही,’ असे म्हटलंय.

कमला यांच्या कुटुंबात कोलोन कॅन्सरचा इतिहास

कमला हॅरिस यांच्या कुटुंबात कोलन कर्करोगाचा इतिहास आहे. त्यांना काही गोष्टींची अॅलर्जीही आहे. यामुळे त्या नियमितपणे कोलोनोस्कोपी करत राहतात आणि स्वतःची काळजी घेतात, असे त्यांचे डॉक्टर जोशुआ सिमन्स यांनी सांगितले. दरम्यान, टीमने ‘एक्स’वर लिहिले होते, आता तुमची पाळी डोनाल्ड ट्रम्प. याआधी कमला यांनीही एका रॅलीत ट्रम्प यांच्या मानसिक आरोग्यावर प्रश्न उपस्थित केले होते.