कराड-चिपळूण मार्गावरील वाहतूक दुसऱ्या दिवशीही ठप्प, दुसरा पूलही वाहून गेला; बस सेवा अजूनही बंदच

कराड-चिपळूण मार्गावरील वाहतूक दुसऱया दिवशीही ठप्प झाली असून, मागील 24 तासांपासून अवजड वाहने जागेवरच अडकून पडली आहेत. सलग दुसऱया दिवशी भराव पूल वाहून गेल्याने कोकणात जाणारी एसटी वाहतूक तसेच मालवाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.

पाटण तालुक्यातील वाजेगाव येथे भराव पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला होता. त्यानंतर आज शिरळ गावाजवळील दुसरा भराव पूलही पाण्याच्या प्रवाहात नष्ट झाला. परिणामी, कराड-चिपळूण मार्गावरील दोन्ही महत्त्वाचे मार्ग बंद असून, या मार्गावरून जाणारी अवजड वाहने 24 तासांहून अधिक काळ एकाच जागी उभी आहेत.

या परिस्थितीचा फटका एसटी सेवेलाही बसला असून, चिपळूणकडे जाणाऱया एसटी बसेस पाटण आगारातच उभ्या ठेवण्यात आल्या आहेत. नागरिक व प्रवाशांचे मोठे हाल सुरू असून, पर्यायी मार्ग नसल्याने वाहतुकीची अडचण निर्माण झाली आहे.

गेल्या आठ ते दहा वर्षांपासून कराड-चिपळूण मार्गावरील पाटण ते कोयनानगर या दरम्यानच्या सुमारे 10 किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे काम रखडले आहे. ठेकेदारांची निक्रिय भूमिका, प्रशासनाचे दुर्लक्ष व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हे काम लांबणीवर पडले आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.