
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या वादाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्या समर्थकांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्यातच डीके शिवकुमार यांनी एका कार्यक्रमात संकेताद्वारे काँग्रेस हायकमांडला त्यांच्या वचनाची आठवण करून दिली आहे. आपले शब्द खूप महत्त्वाचे असतात. आपण एखाद्याच्या शब्दावर विश्वास ठेवतो. त्यानंतर त्यांनी दिलेला शब्द पाळण्याची जबाबदार त्यांची असते. शब्दांमध्ये खूप शक्ती आहे. त्यामुळे आता वचन पाळण्याची वेळ आली आहे, असे सांगत शिवकुमार यांनी पक्षश्रेष्ठींना त्यांच्या वचनाची आठवण करून दिली आहे.
एका कार्यक्रमाला संबोधित करताना शिवकुमार म्हणाले, एक म्हण आहे की शब्दांमध्ये प्रचंड शक्ती असते. प्राण जाय पर वचन न जाय, या म्हणीतूनचही वचनाचे महत्त्व आपल्याला समजते. आपण आपले वचन पाळणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. न्यायाधीश असोत, राष्ट्रपती असोत, मी असो किंवा कोणीही असो, वचन पाळणे महत्त्वाचे असते. आपण सर्वांनी त्याचा आदर केला पाहिजे, असे शिवकुमार यांनी म्हटले आहे.
यावेळी शिवकुमार यांनी नंतर ‘खुर्ची’वरही मार्मिक टिप्पणी केली. त्यांनी सभोवतालच्या समर्थकांना बसण्यास सांगितले. मात्र, ते उभेच होते, त्यावर शिवकुमार म्हणाले, माझ्या मागे उभे असलेल्यांना खुर्चीची किंमत माहित नाही. त्यांना मिळणाऱ्या कोणत्याही खुर्चीवर बसण्याऐवजी ते उभेच आहेत. त्यांच्या या टिप्पणीला समर्थकांनी हास्याने दाद दिली.
गेल्या काही आठवड्यांपासून शिवकुमार समर्थक आमदार दिल्लीला भेट देत आहेत, यामुळे सत्ताबदलाच्या शक्यतांबद्दल चर्चा सुरू झाली आहे. तसेच कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर डीके शिवकुमार यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होते. त्यावेळी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना अडीच-अडीच वर्षे कार्यकाळ मिळेल, असे ठरले होते. पक्षश्रेष्ठींना शिवकुमार यांना तसे वचन दिले होते, असे सांगण्यात येते. त्यामुळे शिकुमार यांनी पक्षश्रेष्ठींना त्यांच्या वचनाची आठवण करून दिली आहे. त्यामुळे कर्नाटकात सत्ताबदलाच्या चर्चा सुरू आहेत.
हायकमांड – मी, राहुल जी आणि सोनिया जी एकत्रितपणे या मुद्द्यावर निर्णय घेईन आणि तो सोडवू, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. या गोंधळाला पूर्णविराम देण्यासाठी, हायकमांडला लवकरच निर्णय घ्यावा लागेल, असे मत दोन्ही गटाच्या समर्थकांनी व्यक्त केले आहे. तसेच हायकमांड जो निर्णय घेईल, त्याचा आम्ही आदर करू, असे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

























































