स्वच्छ आणि सुंदर कल्याण-डोंबिवलीसाठी करोडो रुपयांचा चुराडा, 22 वरून 24… नंबर रसातळाला; स्मार्ट सिटीची ऐशी की तैशी

स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत. स्मार्ट सिटीची घोषणा झाल्यापासून गेल्या आठ वर्षांत विकासाचे एकही ठोस काम मार्गी लागलेले नाही. करदात्या नागरिकांचे जगणे सुसह्य करण्याऐवजी केवळ स्वच्छ, सुंदर कल्याण-डोंबिवलीच्या नावाखाली अक्षरशः करोडो रुपयांचा चुराडा केला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षणाने यावर शिक्कामोर्तबच केले आहे. गेल्या वर्षी 22 वा असणारा नंबर यावेळी 24 वर गेला आहे. प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे पालिकेचा कारभार दिवसेंदिवस रसातळाला जात असून स्मार्ट सिटीची ऐशी की तैशी पाहायला मिळत आहे.

केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षण 2024-25 मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेची पीछेहाट झाली आहे. मागील वर्षी अस्वच्छतेचा शिक्का पुसण्याच्या प्रयत्नात या शहराने 22 व्या स्थानी मजल मारली होती. मात्र यंदा हे नामांकन 2 अंकांनी घसरले असून यंदा पालिकेला 24 व्या स्थानी समाधान मानावे लागले आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी, कचऱ्याचा डोंगर हटविण्यासाठी तसेच शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याचे संकलन आणि विल्हेवाट यासारख्या प्रकल्पावर करोडोंचा चुराडा केल्यानंतरही स्वच्छतेच्या सर्वच निकषात कल्याण-डोंबिवलीची घसरण झाली. कल्याण रेल्वे स्थानकातच प्रवाशांचे अस्वच्छतेने स्वागत होते, तर रस्त्याच्या कडेला जागोजागी फेकला जाणारा आणि वेळ मिळेल तेव्हा उचलला जाणारा कचरा, भिंतीवर मारल्या जाणाऱ्या गुटखा, पानाच्या पिचकाऱ्या यामुळे शहराला बकाल स्वरूप आले आहे.

मंत्र्यांनी कान टोचूनही ढिम्म कारभार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 2017 साली एका कार्यक्रमात कल्याण-डोंबिवली हे देशातील सर्वात अस्वच्छ शहर असा ठपका ठेवला होता. मंत्र्यांनी कान टोचूनही प्रशासन मात्र ढिम्मच आहे. स्वच्छतेच्या बाबतीत पहिल्या 10 शहराच्या यादीत स्थान मिळविण्याचे स्वप्न अद्याप कल्याण-डोंबिवली शहराला पूर्ण करता आले नाही.

उल्हासनगरची भरारी
उल्हासनगर – केंद्र शासनाने दिलेल्या गाईडलाईनचे तंतोतंत पालन करणाऱ्या उल्हासनगर महानगरपालिकेने केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेतली आहे. 2024 च्या सर्वेक्षणात देशभरातील तब्बल 446 शहरात 43 वा क्रमांक पटकावला. याबाबत आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.