ही पहा केडीएमसीची ‘स्मार्ट सिटी’; कल्याणमधील ठाकूरपाडा विद्यार्थ्यांच्या नशिबी चिखलवाट

>> दत्तात्रेय बाठे

कल्याण-डोंबिवली शहर स्मार्ट सिटी बनत असल्याच्या गमजा मारणाऱ्या केडीएमसी प्राशासनाचे पितळ उघडे पडले आहे. पालिका क्षेत्रातील अनेक भागांमध्ये अजूनही धड चालायलाही रस्ता नसल्याचे वास्तव समोर आले आहे. टिटवाळा परिसरातील ठाकूरपाडा येथे महापालिकेची पहिली ते पाचवीची शाळा आहे. मात्र शाळेत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना चिखल ातून रस्ता तुडवत जावे लागते. पालिका प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे मुलांच्या नशिबी मरणयातना आल्या आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिकेने नुकतीच नवीन सात सेमी इंग्रजी शाळा सुरू करण्याची घोषणा केली. मात्र दुसरीकडे टिटवाळा येथील ठाकूर पाड्यातील शाळेत जाण्यासाठी प्रशासन घड रस्ताही करू शकले नाही. सेमी इंग्रजीचे धडे देणाऱ्या पालिकेला मुलांच्या सुरक्षिततेचे काहीच सोयरसुतक नसल्याचा संताप पालकांनी व्यक्त केला. मोठा पाऊस झाला की हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीस अपुरा होतो. गाडी तर दूरच पायी चालणेही धोकादायक होते. परिणामी अनेक विद्यार्थी पावसाळ्यात शाळेला जाणे टाळतात. रस्त्यासारख्या मूलभूतप्रश्नी प्रशासन उदासीन का, असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे.

हजारो कोटी कुणाच्या घशात?
स्मार्ट सिटी योजनेच्या नावाखाली हजारो कोटींचा खर्च केला जात असताना विद्यार्थ्यांना अजूनही चिखलाच्या दलदलीतून वाट काढावी लागत आहे. विद्यार्थी दररोज जीव मुठीत धरून शाळेत पोहोचतात. चिखल, घाणीचे पाणी, पाय घसरून अपघात या सगळ्याचा सामना करत ते शिक्षण घेत आहेत. सुरक्षेसाठी मुलांसोबत पालकांना रोज शाळेत जावे लागते. या पार्श्वभूमीवर ‘स्मार्ट सिटी’चा गाजावाजा म्हणजे केवळ कागदावरचा स्वप्ननगरीचा खेळ असल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी दिल्या.