Kedarnath Yatra Landslide- केदारनाथ यात्रा पुन्हा थांबली! सोनप्रयागजवळ भूस्खलन, यात्रेकरू सुखरुप

केदारनाथ यात्रेला पुन्हा एकदा हवामानाचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे मुंकटिया स्लाइडिंग झोनमध्ये भूस्खलन झाले असून, यामुळे सोनप्रयागचा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबली असून, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने यात्रा तात्पुरती बंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंकटिया परिसरात मुसळधार पावसामुळे अचानक डोंगरावरून दगड आणि ढिगारा पडू लागला. काही वेळातच संपूर्ण रस्त्यावर आला त्यामुळेच रस्ता ढिगाऱ्याने पूर्णपणे झाकला गेला. त्यामुळेच पादचाऱ्यांसाठी आणि वाहनांसाठी आता मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. पोलिसांच्या मते, केदारनाथ मार्गावरील हे ठिकाण संवेदनशील भूस्खलन क्षेत्र आहे.

घटनेच्या वेळी गौरीकुंडहून परतताना काही भाविक मुंकटिया परिसरात अडकले होते. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि अडकलेल्या सर्व यात्रेकरुंना सोनप्रयाग येथे सुरक्षितपणे आणण्यात आले. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

परिस्थितीचा आढावा घेतला जात असून लवकरच ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे प्रवास काही काळासाठी थांबवण्यात आला आहे. तसेच, प्रवाशांना प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आणि माहितीशिवाय यात्रा सुरू न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्थानिक प्रशासन, पोलिस आणि एसडीआरएफ पथके घटनास्थळी उपस्थित असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ढिगारा हटवल्यानंतर प्रवास पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. यात्रेकरुंना सध्या सोनप्रयाग आणि आसपासच्या सुरक्षित ठिकाणी थांबवण्यात आले आहे.