
रुद्रप्रयाग आणि चमोली जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने केदारनाथ यात्रा सोमवारी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. यामुळे सर्व यात्रेकरूंना सोनप्रयाग आणि गौरीकुंड येथे थांबवण्यात आले आहे.
मुंकटिया स्लाइडिंग झोनमध्ये भूस्खलनामुळे मातीचे ढिगारे आणि दगडांमुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे, त्यामुळे प्रशासनाने यात्रा तात्पुरती थांबवली, असे पोलिसांनी सांगितले. गौरीकुंडहून परतणाऱ्या काही यात्रेकरू स्लाइडिंग झोनमध्ये अडकले होते. मात्र एसडीआरएफने अडकलेल्या यात्रेकरूंना सोनप्रयाग येथे सुरक्षितपणे आणले, असे त्यांनी सांगितले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने केदारनाथ यात्रा तात्पुरती थांबवली आहे.
बद्रीनाथ महामार्गावरील सिरोबागड येथे भूस्खलन झाल्यामुळे रस्ता बंद आहे. महामार्ग विभागाच्या यंत्रणा महामार्ग पुन्हा खुला करण्यासाठी कार्यरत आहेत. परंतु सततच्या पावसामुळे मदतकार्यात अडथळा येत आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला शेकडो वाहने अडकली आहेत, ज्यामुळे भाविक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणी येत आहेत.