
मैदानावर खेळताना भावनांवर नियंत्रण ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे, असा मोलाचा सल्ला हिंदुस्थानचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी पनवेल येथे दिला. 14 वर्षांखालील परिवर्तन कप स्पर्धेत डिव्हाईन क्रिकेट अकादमीने स्पोर्ट्स फिल्डला नमवत विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळय़ाप्रसंगी वेंगसरकर म्हणाले, तुम्ही टीव्हीवर आंतरराष्ट्रीय सामने पाहता. झेल घेतल्यानंतर किंवा विकेट मिळाल्यावर खेळाडूंचे आक्रमक हावभाव दिसतात, मात्र त्यांचे अनुकरण करू नका. त्यांच्या मेहनतीची सवय, खेळण्याची पद्धत आणि खेळाप्रती असलेली निष्ठा आत्मसात करा.
दरम्यान, अंतिम फेरीत डिव्हाईन क्रिकेट अकादमीने स्पोर्ट्स फिल्डवर 10 धावांनी थरारक विजय मिळवत विजेतेपद पटकावले. स्पोर्ट्स फिल्डने नाणेफेक जिंकून डिव्हाईनला फलंदाजीला पाठवले. लकी साकारिया (16/4), रांचो तेरवे (20/2), ओम लोखंडे (26/2) आणि स्वरूप मोरे (18/2) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर डिव्हाईनला 31.1 षटकांत 102 धावांत गुंडाळले. माधव ठाकरे (33) आणि योहान बरुआ (21) यांनी संघाला काहीसा आधार दिला. त्यानंतर 103 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्पोर्ट्स फिल्डचा रियान तेरवे (49) एकाकी झुंज देत होता, मात्र हृदान पाटील (9/3) आणि माधव ठाकरे (8/3) यांच्या टिच्चून गोलंदाजीमुळे स्पोर्ट्स फिल्ड 92 धावांत कोसळला. माधव ठाकरे (111 धावा, 4 विकेट) सर्वोत्तम फलंदाज व सामनावीर ठरला. लकी साकारिया (11 विकेट) सर्वोत्तम गोलंदाज, आकाश काwशिक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक (8 झेल) तर रियान तेरवे (233 धावा, 5 विकेट) स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.

























































