
दोघा भामटय़ांनी एका केनियन महिलेला पोलीस असल्याची बतावणी करून त्या महिलेकडील दोन बॅगा घेऊन गेले. त्या बॅगेत 66 लाख 45 हजार रुपयांची रोकड होती. याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास करत एका आरोपीला ठाण्यात पकडले. त्याच्याकडून 79 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सुमय्या आब्दी (26) या केनियन महिला टॅक्सीने प्रवास करत असताना फोर्ट येथील अलाना सेंटर इमारतीच्या समोर त्यांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी थांबवले. पोलीस असल्याचे सांगत त्या दोघांनी आब्दी यांच्या दोन बॅगा आपल्याकडे घेतल्या आणि तुम्ही पोलीस ठाण्यात या असे सांगून निघून गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आब्दी यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस पथकाने तपास सुरू केला. उपनिरीक्षक देवरे व पथकाने 50 ते 60 सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यानुसार गुन्ह्यातील एक आरोपी ठाण्यात राहणारा असल्याचे समजताच पोलिसांनी त्याचे घर शोधले. मग तेथे सापळा रचून सुरेश चव्हाण (48) याला पकडले.

























































