
केरळममधील मलप्पुरम जिल्ह्यातील वंडूर भागात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. यूडीएफ उमेदवार ए.पी. अनिल कुमार यांच्या निवडणूक प्रचारासाठी जात असताना थरूर यांचा ताफा अज्ञातांनी अडवला. यावेळी त्यांच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली असून पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
थरूर दोन वाहनांच्या ताफ्यासह प्रवास करत होते. थरूर पहिल्या गाडीत बसले होते. अचानक दोन कारमधून आलेल्या सुमारे 8 जणांनी भररस्त्यात थरूर यांची गाडी अडवली. हल्लेखोरांनी गाडीला पुढे जाण्यापासून रोखले आणि कारच्या काचांवर जोरात प्रहार करण्यास सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून थरूर यांच्या सुरक्षा रक्षकाने मध्यस्थी करण्याचा आणि रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी सुरक्षा रक्षकावरच हल्ला चढवला. सुरक्षा रक्षकाला धक्काबुकी आणि मारहाण करण्यात आल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दोन जण पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांच्यासोबत केरळममध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. #KeralaAssemblyElection2026 pic.twitter.com/LaVAdyPUXZ
— Saamana Online (@SaamanaOnline) April 4, 2026
शशी थरूर यांनीही शनिवारी ट्विट करत काल रात्री आपल्यासोबत धक्कादायक घटना घडल्याची माहिती दिली. अज्ञात हल्लेखोरांनी सुरक्षा रक्षकावर हल्ला केला. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती थरूर यांनी दिली.
Truly touched by all the messages and calls expressing concern about the untoward incident last night when my security guard was attacked. He is well and I was untouched. Thank you to all friends and well-wishers. We carried on undaunted yesterday and concluded two more events as…
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) April 4, 2026
केरळममध्ये 9 एप्रिलला मतदान
केरळम विधानसभेच्या 140 जागांसाठी 9 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 4 मे 2026 रोजी जाहीर केला जाईल. राज्यात यंदा एलडीएफ, यूडीएफ आणि भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे.

























































