
खर्डी गावातील शिवकालीन पाझर तलाव शेवाळाच्या गाळात रुतला आहे. सद्यस्थितीत तलावात निर्माल्य व कचरा जमा झाल्याने पाण्याला दुर्गंधी पसरली असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. त्यामुळे या तलावातील गाळ काढून तलावाचे नव्याने सुशोभीकरण करावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. तसेच तलावाच्या चारही बाजूने वॉकिंग ट्रॅक तयार करून तलावाचे पाणी स्वच्छ करून ते पाणी वापरात कसे आणता येईल यादृष्टीने प्रयत्न करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.
खर्डी गाव परिसरातील पर्यटनस्थळ म्हणून नैसर्गिक स्रोत असलेले पाझर तलाव प्रसिद्ध आहे. मात्र सध्या या तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. अनेक नागरिक या ठिकाणी फेरफटका मारायला येत असतात. मात्र तलावाचा परिसर घाण व कचऱ्याने मोठ्या प्रमाणात व्यापला असल्याने शासनाच्या स्वच्छ भारत योजनेला हरताळ फासला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
संरक्षक भिंत नसल्याने तलावाला बकालपणा
पाझर तलाव सुमारे चार एकर जागेत असून दरवर्षी पावसाळ्यात हा तलाव भरून वाहत असतो. या तलावाला संरक्षक भिंत नसल्याने त्यात जनावरे, निर्माल्य टाकणे यासारखे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे या तलावाला बकालपणा आला आहे. दरम्यान, सुशोभीकरणासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ग्रामविकास अधिकारी दीपक साळवे यांनी सांगितले.
शिवकालीन तलावाचे सुशोभिकरण करुन त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना कट्टा, खाऊ गल्ली व वॉकिंग ट्रॅक बनविण्यात यावे. उत्पन्नासाठी त्यात मत्स्य उद्योग सुरू करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करावा.
भास्कर बेनके, शाखाप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे



























































