हलगर्जीपणाचा कळस! सिझरनंतर महिलेच्या पोटात राहिला टॉवेल अन् पुन्हा करावी लागली शस्त्रक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉक्टरांची एक चूक रुग्णाला किती महागात पडू शकते याचा प्रत्यय मध्य प्रदेशातात पहायला मिळाला. खरगोन जिल्हा रुग्णालयातून डॉक्टरांच्या बेजबाबदारपणाची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भीकनगाव येथील एका महिलेची 17 मार्च रोजी प्रसूतीसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यावेळी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी आणि त्यांच्या टीमने रक्तस्त्राव रोखण्यासाठी वापरलेला ‘सर्जिकल नॅपकिन’ चुकून महिलेच्या पोटातच विसरले. आणि त्यावर टाके घातले. या गंभीर चुकीमुळे संबंधित महिलेचा जीव धोक्यात आला असून सध्या तिच्यावर इंदूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शस्त्रक्रियेनंतर 21 मार्च रोजी महिलेला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र त्यानंतर तिला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. कुटुंबीयांनी वारंवार जिल्हा रुग्णालयात धाव घेतली, परंतु डॉक्टरांनी “शस्त्रक्रिया झाल्यामुळे थोडा त्रास होणारच” असे सांगून या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. अखेर प्रकृती अधिक बिघडल्याने तिला इंदूरला नेण्यात आले. तेथील एका खासगी रुग्णालयात तपासणी केली असता, तिच्या पोटात काहीतरी वस्तू असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले.

पोटदुखीचे कारण समजल्यानंतर इंदूरच्या रुग्णालयात पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी डॉक्टरांनी त्या महिलेच्या पोटातून तो सर्जिकल नॅपकिन बाहेर काढला. या संपूर्ण प्रक्रियेत पीडित कुटुंबाला दोन लाख रुपयांचा खर्च आला असून, महिलेची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे, त्यामुळे तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. केवळ डॉक्टरांच्या एका चुकीमुळे एका महिलेला अशा भीषण प्रसंगाला सामोरे जावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाची दखल घेत खरगोनच्या जिल्हाधिकारी भव्या मित्तल यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेची सत्यता तपासण्यासाठी तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, अहवाल प्राप्त होताच दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.