
मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाच्या अशा खेड तालुक्यातील कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेतं ९३ पदे मंजूर असताना त्यातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची मिळून एकूण ३७ पदे रिक्त असल्याने त्याचा थेट परिणाम हा रुग्णालयात नियमितपणे आपले आरोग्य तपासणी आणि उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर होत आहे. असे असले तरी आरोग्य सेवेसारख्या अतिशय महत्वाच्या असलेल्या रुग्णसेवेकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे लक्ष नाही हेच यातून अधोरेखित होत आहे.
रुग्णांना आर्थिक भुर्दंड
मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खेड कळंबणी रुग्णालयाचे महत्त्व हे अधिक आहे. तालुक्यात एवढे मोठे दुसरे सरकारी रुग्णालय उपलब्ध नसल्याने खेड तालुक्यातील शहरी असो वा ग्रामीण भागातील रुग्णांना येथे येऊनच उपचार घ्यावे लागतात. सध्या या रुग्णालयाची वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागामुळे आरोग्य यंत्रणा बिघडली असल्याने लोकांना आर्थिकदृष्ट्या न परवडणाऱ्या खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे लागतात. ही परिस्थिती आरोग्य यंत्रणेने बदलायला हवी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यायला हवे.
या पदांची भरती रखडली
मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यात कळंबणी येथे उपजिल्हा दर्जाचे एक रुग्णालय आहे. या रुग्णालयात विविध आस्थापनांची कार्यरत मंजूर पदे ९३ आहेत त्यातील ३७ पदे ही रिक्त आहेत. रिक्त पदे असलेल्यांमध्ये वैद्यकीय अधीक्षक वर्ग १ चे एकच पद आहे ते रिक्तच आहे तर वैद्यकीय अधिकारी वर्ग २ चे शल्यचिकित्सक १ पद मंजूर आहे तेसुद्धा रिक्तच आहे, तर वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग तज्ज्ञ १ पद मंजूर आहे मात्र त्यांच्याकडे मंडणगड ग्रामीण रुग्णालय तसेच दापोली उपजिल्हा रुग्णालय या रुग्णालयाची प्रभारी जबाबदारी असल्याने ते असून नसल्यासारखेच आहे , बालरोग तज्ज्ञ १ मंजूर असले तरी येथे नियुक्ती असलेले वैद्यकीय अधिकारी हे प्रतिनियुक्तीने ग्रामीण रुग्णालय गुहागर येथे ते कार्यरत असल्याने ते असून याचा काहीच उपयोग नाही, वैद्यकीय अधिकारी भूलतज्ज्ञ ३, अस्थीव्यंग एकच जागा तीसुद्धा रिक्तच , वैद्यकीय अधिकारी रिक्त पदे ६ , सहाय्यक अधीक्षक रिक्त १, वरिष्ठ लिपिक रिक्त १, बाह्यरुग्ण लिपिक रिक्त ३, सिस्टर इन्चार्ज रिक्त ३, अधिपरिचारिका दंत विभाग रिक्त १, बालरोग अधिपरिचारिका रिक्त १, औषध निर्माण अधिकारी रिक्त १, प्रयोग शाळा सहाय्यक रिक्त १, वाहनचालक रिक्त १, दंत यांत्रिक रिक्त १, शस्त्रक्रिया परिचर रिक्त १, व्रणोपचारक रिक्त १, सफाईकामगार रिक्त ८, अशी एकूण ३७ पदे रिक्त आहेत.
या आहेत समस्या
कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दररोज रुग्ण तपासणीकरिता येणाऱ्या रुग्णांची सरासरी संख्या १४० ते १५० दरम्यान आहे. आरोग्य तपासणी करिता येणाऱ्या रुग्णांची दररोजची आकडेवाडी वाढत्या क्रमांकाची असली तरी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांची ससेहोपलट होत आहे. त्यामुळे नाइलाजास्तव चिपळूण, महाड आदी शहरांमधील खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांना आपले आरोग्यमान तपासणीसाठी खेडपासून दूर जावे लागते. ते खर्चिक तसेच वेळेचा अपव्यय करणारे असते. खेड तालुक्यात २१५ महसुली गावे आहेत. ११४ ग्रामपंचायती आहेत. ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. ४८ उप आरोग्य केंद्र आहेत, तर कळंबणी येथे उपजिल्हा रुग्णालय आहे तसेच मरणासन्न अवस्थेतील खेड नगर परिषदेचा एक दवाखाना आहे. खेड तालुक्याची सन २०११ च्या जनगणनेनुसार १,४८,००० लोकसंख्या असून खेड शहराची १६,८९२ लोकसंख्या आहे. तालुक्यात ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे असली तरी फक्त कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातच शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेहांना घेऊन यावे लागते. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटरमध्ये फक्त गरोदर मातांची तपासणी केली जाते मात्र अन्य विकारांच्या व्याधींची सोनोग्राफी केली जात नाही कारण येथे तज्ञच उपलब्ध नाही त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. येथे सिटिकॅन्स मशिनरी साठी स्वतंत्र खोली तयार असली तरी अजुनही मशीनची उपलब्धता करण्यात आलेली नाही.
२०० खाटांचा हॉस्पिटल करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे मात्र आहे त्याच रुग्णालयात रुग्णांना धड सेवा मिळत नाहीत.सेवा अपु-या मिळत असून कर्मचारी अधिका-यांची वानवा असल्याने एकुणच परिस्थिती बिकट असताना आहे ते सुधारण्याआधी वा रुग्णांना सेवा देण्याचे टाकून अधिकचा फापट पसारा कशासाठी अशाप्रकारची चर्चा खूलेआम सुरू आहे. एकुणच काय तर खेड तालुक्यात असणारे आणि मुंबई गोवा महामार्गावरील कळंबणी उपजिल्हा रुग्णालय हे एक खेड तालुक्यातील लोकांसाठी आरोग्य तपासणी आणि आरोग्य उपचारासाठी महत्वाचे असे रुग्णालय आहे या रुग्णालयाचा दर्जा वाढला तर ते चांगलेच आहे मात्र सद्यस्थितीत येथील रुग्णालयात रिक्त पदांची भरती तसेच प्रभारींऐवजी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिका-यांची भरती करून रुग्णसेवेला अधिक प्राधान्य देण्यासाठी लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाने अधिक लक्ष देणं गरजेचे आहे. कारण हे रुग्णालय मुंबई गोवा महामार्गावर आहे अपघातांच्या घटना महामार्गवर कायमच घडत असतात त्यामुळे पोलादपुर ते चिपळुण दरम्यानच्या मार्गावरील अपघातग्रस्तांना प्राथमिक उपचारासाठी खेड कळंबणी उप जिल्हा रुग्णालयातच दाखल करण्यात येते . येथील प्राथमिक उपचारानंतरच आवश्यक त्या रुग्णांना पुढील उपचारासाठी अन्यत्र हलविण्यात येते शिवाय खेड संपूर्ण तालुक्यातील तसेच दापोली मंडणगड येथीलही काही रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात तेव्हा या रुग्णालयाचे महत्व लक्षात घेऊन आवश्यक त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरणे आवश्यक आहे त्यासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.


























































