
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये समोर आलेल्या ‘सीपीआर’मधील भ्रष्टाचाराच्या नोंदी असलेल्या ‘लाल डायरी’प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख आणि आरोग्य उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी नामदेव मोरे यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. वैद्यकीय बिलातील अनियमितता, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबतचे आदेश रात्री उशिरा सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल कुमेरिये यांनी काढले.
निलंबनाचा कार्यकाल आणि पुढील आदेशापर्यंत डॉ. प्रशांत वाडीकर आणि डॉ. सुप्रिया देशमुख यांचे मुख्यालय उपसंचालक, आरोग्यसेवा, पुणे मंडळ येथे राहणार आहे. त्यांना हे मुख्यालय सोडून जाता येणार नाही. शिवाय खासगी व्यवसाय वा नोकरीही करता येणार नसल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दोन महिन्यांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी शल्यचिकित्सक कार्यालयात वैद्यकीय बिले मंजुरीसाठी बेकायदेशीररीत्या होत असलेल्या आर्थिक देवाण-घेवाणीचा भंडाफोड केला होता. जिल्हा शल्यचिकित्सकांपासून त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी, तसेच काही शिपाई असे मोठे रॅकेट असल्याचे आरोप करत त्यांनी काही पुरावे समोर आणले होते. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांना जाब विचारताना त्यांच्याजवळ लाल रंगाची डायरी सापडली होती. त्यामध्ये बिले मंजुरी करण्यासाठी कोणाकोणाला किती-किती रुपये देण्यात आले, याची नोंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली. या प्रकरणाचे पडसाद नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनातही उमटले होते. त्यासंदर्भात तीनसदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीनेच जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील आर्थिक व्यवहारांच्या फायली तपासल्यानंतर काही नोंदी शासकीय नियमानुसार नसल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर आरोग्यमंत्री तथा जिल्हा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही दिली होती.
दोन महिने झाले तरीसुद्धा त्या ‘लाल डायरी’ प्रकरणातील दोषींवर कारवाई होत नसल्याने शुक्रवारी (10 रोजी) दुपारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून आरोग्य उपसंचालकांना धारेवर धरण्यात आले होते. तसेच दोषींवर कोणाचा वरदहस्त आहे? याचा जाब प्रकाश आबिटकर यांना विचारण्याचा इशाराही देण्यात आला होता. तत्पूर्वी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

























































