‘गोकुळ’च्या वादग्रस्त जाजम, घड्याळ खरेदीच्या चौकशीचे अखेर आदेश; शिवसेना उपनेते संजय पवार यांच्या मागणीला यश

गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्याकडून विनाटेंडर दूध संस्थांना तब्बल पावणेचार कोटींचे जाजम आणि घड्याळ भेटवस्तूंचे वाटप करण्यात आल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार यांच्या तक्रारीनंतर चौकशीसाठी जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-2 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याप्रकरणी पंधरा दिवसांत अहवाल देण्याचे आदेश सहकारी संस्था (दुग्ध) पुणे विभागाचे विभागीय उपनिबंधक यांच्याकडून देण्यात आले आहे.

गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक गोडबोले यांनी तीन कोटी 74 लाखांचे जाजम व घड्याळ भेटवस्तू देताना कोणत्या आधारे ही खरेदी केली, असा जाब विचारत शिवसेना उपनेते संजय पवार आणि सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाकडून येथील गोकुळ दूध संघासह येथील सहायक दुग्ध निबंधक प्रदीप मालगावे यांना निवेदन देण्यात आले होते, तर 15 ऑगस्टपर्यंत याबाबत खुलासा देण्याचे दिलेले आश्वासन गोडबोले यांनी पाळले नाही. त्यामुळे संजय पवार यांनी याबाबत खडसावले होते. याप्रकरणी आता सांगलीचे सहकारी संस्था पदुम, सांगलीचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-2 सदाशिव गोसावी यांची चौकशी करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होऊ नये, ही अपेक्षा असून, त्यांच्या घामाचे पैसे सत्तेचा दुरुपयोग करून बेकायदेशीररीत्या उधळले जात आहेत. अशा लोकांकडून पैसे वसूल झालेच पाहिजेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तसेच जबाबदार कार्यकारी संचालक आणि ऑडिटर यांची चोकशी होऊन गुन्हे दाखल केले पाहिजेत. तसेच तपास निःपक्षपाती होऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी प्रतिक्रिया उपनेते संजय पवार यांनी व्यक्त केली आहे.