
लहान मुलाला गेम खेळायला मोबाईल देणे एका शेतकऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. म्हशी घेण्यासाठी शेतकरी बापाने सात लाख रुपये दिवस-रात्र काबाड कष्ट करून साठवले होते. पण सहावीत शिकणाऱ्या त्याच्या मुलाने ‘फ्री फायर’ गेम खेळताना नकळत पाच लाख रुपये उडवले. खात्यातील पैसे गेल्याच्या मेसेजमधील ट्रांजेक्शन आयडीवरून सायबर पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केला. कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यात ही घटना घडली असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राधानगरी तालुक्यातील एका शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने स्वतःचा म्हशीचा गोठा उभा केला. हा व्यवसाय आणखी वाढवण्यासाठी दोघे नवरा बायको रात्रंदिवस कष्ट करून, पैसे बँकेत जमा करायचे. या जोडप्याला एक मुलगा असून तो सहावीत शिकतो. या मुलाला मोबाईलवर गेम खेळण्याची प्रचंड आवड असल्याने तो सतत वडिलांच्या मोबाईलवर गेम खेळायचा.
या जोडप्याने हरियाणातून चार म्हशी आणण्यासाठी पै पै करून पैसे जमवले होते. मात्र खात्यात जमा झालेल्या पैशांची माहिती घेण्यासाठी जेव्हा ते बँकेत गेले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. बँक खात्यात केवळ दोन लाख रूपये शिल्लक दिसल्याने त्या शेतकऱ्याला धक्काच बसला. बँकेकडे अधिक चौकशी केली असता, बँकेने त्यांना पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. शेतकऱ्याने त्वरित सायबर पोलिसांकडे धाव घेतली. सायबर पोलिसांनी वेगाने तपास करत बँक खात्यातील झालेले आर्थिक व्यवहार तपासले. तसेच शेतकऱ्याचा मोबाईल देखील तपासला. यावेळी काही रक्कम फ्री फायर गेममध्ये शस्त्र घेण्यासाठी यूपीआय पद्धतीने ट्रांजेक्शन केल्याचं समोर आलं.
अधिक तपास केला असता वडिलांच्या गुगल पे, फोन पे सारखे यूपीआय असलेल्या मोबाईलमध्ये “फ्री फायर” गेम खेळत असताना, नकळत आभासी शस्त्र घेण्यासाठी त्या मुलाने ट्रांजेक्शन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्याचवेळी काही सायबर हॅकरने अकाउंट हॅक करून आणखी पैसे घेतल्याचे देखील समोर आले.
बँकेशी संलग्न मोबाईल नंबर असल्याने सर्वांनी आपल्या मोबाईलचा आणि त्यामधील ॲप्सचा योग्य वापर करावा. अनावश्यक अॅप्स तसेच लिंक ओपन करू नयेत. कळत नकळत अशी ऑनलाइन आर्थिक फसवणूक टाळायची असेल तर या संदर्भात प्रत्येक मोबाईल धारकाने नेहमी सजग राहावे असे आवाहन सायबर पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्याकडून करण्यात आले आहे.