
कोल्हापूर जिल्ह्यात आज चौथ्या दिवशीही धुवांधार पावसाने हजेरी लावली. पहाटेपासून संततधार पावसामुळे ठीक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याची स्थिती पहावी लागत होती. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासात तब्बल दीड फुट वाढ झाली. काल सायंकाळी 15 फूट तीन इंच असलेली पाणी पातळी आज सायंकाळी पाचच्या सुमारास 16 फूट नऊ इंच झाली होती. तर कसबा बावडा येथील राजाराम बंधारा आज दुपारी पाण्याखाली गेल्याने, या मार्गावरील वाहतूक स्थानिक नागरिकांकडून बंद करण्यात आली.
दरम्यान पावसामुळे गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे सुर्याचे दर्शन झाले नाही. गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचे दिसून येत आहे. काल दिवसभर कधी संततधार, तर कधी पावसाची रिपरिप सुरुच होती. आज पहाटेपासून सायंकाळपर्यंत संततधार पावसामुळे सकल भागात पाणी साचून रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत होते.संततधार पावसामुळे पंचगंगा नदीवरील कसबा बावडा येथील राजाराम बंधारा आज दुपारी पाण्याखाली गेला. त्यामुळे कसबा बावडा आणि वडणगे गावाला जोडणारा हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
नियंत्रण कक्ष अजुन सुरु नाही…नाले साफ करण्यात अडचणी…यंदा महापुराचा मोठा फटका सोसावा लागण्याची चिन्हे..
जिल्हा प्रशासनाकडून एक जून पासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापनाची माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू केला जातो. अतिवृष्टी आणि संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून पंचगंगा नदीत प्रात्यक्षिके सादर करून तयारी करण्यात येते.ही तयारी सुरू असतानाच गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यांत सर्वत्र धुवाधार पाऊस होत आहे. यंदा हवामान खात्याचे अंदाज खरे ठरत असल्याचे दिसून येत आहे.आणखी तीन ते चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पावसाची संततधार पाहता, जिल्ह्यात सर्वत्र पावसाळ्याचे चित्र असताना सुद्धा अजूनही आपत्ती व्यवस्थापनाचा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आलेला नाही.सध्या केवळ एका कर्मचाऱ्यांची पंचगंगा नदी पाणी पातळीवर पाहणी करण्यासाठी नियुक्ती करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान गेल्या महिन्याभरात नालेसफाई मोहिमेत महानगरपालिकेकडून तब्बल 18 हजार मेट्रिक टन गाळ काढण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. एवढा काढलेला गाळ कोठे टाकला हा प्रश्नचिन्ह असून पहिल्याच वळवाच्या पावसात उडालेली दैना पाहता, आतापर्यंत झालेल्या नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.त्यात सध्या अजूनही नालेसफाई सुरू असली तरी पावसाच्या पाण्यामुळे उरलीसुरली नालेसफाई करणे अवघड बनले आहे.त्यामुळे यंदा महापुराचे संकट ओढवले तर त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता दिसून येत आहे.