
राज्यसभेत कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गाच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडे कामाच्या प्रगतीबाबत माहिती मागितली. यावर उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.
संजय राऊत म्हणाले की, “कोल्हापूर हा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आणि शहर आहे. कर्नाटकची सीमा देखील जवळ आहे. आपण कोल्हापूरसाठी अनेक प्रकल्प जाहीर केले आहेत. पंचगंगा नदीवर पूल बांधण्याचा प्रकल्पही महत्त्वाचा आहे, कारण कोल्हापूरमध्ये दरवर्षी पूरस्थिती निर्माण होते.” राऊत यांनी पुढे सांगितले की, “माझा प्रश्न असा आहे की कोल्हापूर ते रत्नागिरी हा सुमारे 150 किलोमीटरचा विद्यमान महामार्ग फोर लेन करण्याचा प्रकल्प सुरू आहे. या कामाचा काही भाग सुरू झाला आहे. मात्र रत्नागिरीच्या पुढे हातखंबा या भागात आल्यानंतर काम खूप मंद गतीने सुरू आहे. याचे कारण काय आहे? हातखंब्याच्या पुढे हा प्रकल्प पुढे का जात नाही आणि हा संपूर्ण 150 किलोमीटरचा कोल्हापूर–रत्नागिरी फोर लेन महामार्ग प्रकल्प नेमका कधीपर्यंत पूर्ण होईल?” असा प्रश्न त्यांनी विचारला.
यावर उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले की, “ज्या हातखंबा जंक्शनचा उल्लेख केला जात आहे, तो मुंबई–गोवा महामार्गावर आहे. मी 1995 ते 2000 दरम्यान मंत्री असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपघात झाले होते आणि जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाला होता. त्या वेळी सध्याचे मंत्री उदय सामंत यांच्या वडिलांचा कंत्राटदार म्हणून संबंध होता. त्या ठिकाणी अपघातांची संख्या लक्षात घेऊन मी 24 तासांत त्या ठिकाणाचे दुरुस्ती टेंडर न काढता सुरू केले होते.”
गडकरी यांनी पुढे सांगितले की, कोल्हापूर ते रत्नागिरी या महामार्गाचा पहिला पॅकेज 1032 कोटी रुपयांचा आहे. हा प्रकल्प हायब्रिड अॅन्युइटी मॉडेल (HAM) अंतर्गत असून त्याचे सुमारे 86 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र काही ठिकाणी जमीन संपादनाच्या प्रक्रियेमुळे काम अडकले आहे. जमीन संपादन हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येते आणि जमीन मिळाल्यानंतर हे काम चार ते सहा महिन्यांत पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
दुसरा टप्पा 42.2 किलोमीटरचा असून त्याची किंमत सुमारे 2104 कोटी रुपये आहे. या टप्प्याचे सुमारे 76 टक्के काम पूर्ण झाले आहे. येथेही काही प्रमाणात जमीन संपादनाशी संबंधित अडचणी आहेत. त्या दूर झाल्यानंतर तीन ते चार महिन्यांत हे काम पूर्ण होईल.
तिसरा टप्पा सुमारे 32.96 किलोमीटरचा असून त्याची किंमत 2056 कोटी रुपये आहे. या भागाचे सुमारे 65 टक्के काम पूर्ण झाले आहे. गडकरी म्हणाले की, कोल्हापूर ते रत्नागिरी या मार्गावर मोठ्या प्रमाणात निसर्गरम्य परिसर आणि जंगल क्षेत्र आहे. त्यामुळे वन विभागाच्या परवानग्यांमुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या. त्या अडचणी आता जवळपास दूर झाल्या आहेत.
तसेच, हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. रत्नागिरी म्हणजे कोकणातून सुरू होणारा हा मार्ग अरबी समुद्र किनाऱ्याजवळून पुढे कोल्हापूरमार्गे नागपूरपर्यंत जातो. हा महामार्ग गोव्यालाही जोडतो आणि लॉजिस्टिक दृष्टीनेही खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे उर्वरित काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उर्वरित अडचणी दूर झाल्यानंतर साधारणतः तीन महिन्यांच्या आत हा संपूर्ण प्रकल्प शंभर टक्के पूर्ण होईल.

























































