कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण- घटनेआधी रेड लाईट एरियात गेलो होतो; नराधम संजय रॉयची पॉलिग्राफ चाचणीत माहिती

कोलकाता बलात्कार– हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याने चार तासांच्या पॉलिग्राफ चाचणीत अनेक खुलासे केले. हत्येच्या घटनेआधी त्याने एका मित्रासोबत दारू ढोसली. यानंतर दोघे रेड लाईट एरियात गेले. वाटेत एका मुलीचा विनयभंग केला. यानंतर रात्री उशिरा त्याच्या मैत्रिणीशी व्हिडीओ कॉलवर बोलून नग्न छायाचित्रे मागितली, असे त्याने सांगितले. त्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये परतला, असे त्याने सांगितले. दरम्यान, संजय खोटे बोलत असल्याचा दावा सीबीआयमधील सूत्रांनी केला आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार पहाटे चारच्या सुमारास संजय रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पोहोचला. तिथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केली. त्यानंतर सकाळी मित्राच्या घरी गेला. संजयने सांगितले की, त्याचा मित्र कोलकाता पोलिसांत अधिकारी होता. सीबीआय आणि सेंट्रल फॉरेन्सिक पथकाने रविवारी दुपारी चार तास कोलकाता प्रेसिडेन्सी जेलमध्ये संजयची चौकशी केली.

पॉलिग्राफ चाचणी करताना चिंताग्रस्त

संजय रॉय पॉलिग्राफ चाचणी होत असताना अस्वस्थ आणि चिंताग्रस्त दिसत होता. त्याने खोटी आणि न पटणारी उत्तरे दिल्याचा दावा सीबीआयमधील सूत्रांनी केला असून याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. रॉयच्या वकील कबिता सरकार यांनी मात्र संजय रॉयची पॉलिग्राफ चाचणी केव्हा आणि कुठे केली जाईल याची माहिती मिळाली नव्हती, असा दावा केला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून बचाव पक्षाचा कोणताही वकील उपस्थित राहू शकला नाही, असा दावाही त्यांनी केला.

सीबीआयला याबद्दल संशय

संजयने बहुतेक प्रश्नांची उत्तरे खोटी आणि न पटणारी दिल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी म्हटले आहे. जर तो निर्दोष असेल तर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न का केला? पोलिसांना का कळवले नाही? बलात्कार आणि हत्येप्रकरणी त्याच्याविरोधात इतके फॉरन्सिक पुरावे का आहेत? असे प्रश्न त्याला विचारण्यात आले. दरम्यान, पुढील काही दिवसांत चार कनिष्ठ डॉक्टर आणि एका नागरी स्वयंसेवकाचीही अशाच पद्धतीने चाचणी करण्यात येणार आहे.

सीबीआयचा दावा काय?

रॉयने दावा केला की, तो त्या रात्री दारूच्या नशेत होता. त्याने चुकून पीडितेला सेमिनार हॉलमध्ये पाहिले. तेव्हा ती मृत झाली होती. ते पाहून तो तिथून पळाला, अशी माहिती त्याने पॉलिग्राफ चाचणीत दिल्याचा दावा सीबीआयने केला आहे. तसेच तो खोटे बोलत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, रॉयने प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर त्याचा मित्र अनुपम दत्ताकडे गेला, असा दावा पोलिसांनी केला आहे.

संदीप घोषच्या घराची 11 तास झाडाझडती

सीबीआयने रविवारी आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोषच्या घराची तब्बल 11 तास झाडाझडती घेतली. या छाप्यात बरेच काही हाती लागल्याचा दावा सीबीआयने पत्रकारांशी बोलताना केला. सीबीआयचे अधिकारी अनेक कागदपत्रे सोबत घेऊन गेले. घोषवर आर्थिक अनियमिततेचा आरोप आहे.