पीएफ खातेधारकांना झटका, आता कोविड अॅडव्हान्स काढता येणार नाही

कोविड काळात सुरू केलेली कोविड अॅडव्हान्स सेवा आता बंद करण्यात आली आहे. सरकारी आणि नोंदणीकृत कंपन्यांच्या कर्मचाऱयांना यापुढे ईपीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातून कोविड-19 अॅडव्हान्स काढता येणार नाही. ईपीएफओने ही सुविधा तीन वर्षांनंतर बंद केली आहे. कोरोना महामारीच्या काळात सरकारने कर्मचाऱयांना त्यांच्या पीएफ खात्यातून आगाऊ पैसे काढण्याची सुविधा दिली होती. ईपीएफओने यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे. यात त्यांनी म्हटले की, कोविड-19 ही महामारी आता नसल्यामुळे आगाऊ पैसे देण्याची ही सुविधा त्वरित प्रभावाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा आदेश सूट दिलेल्या ट्रस्टसह सर्वांना लागू असेल. तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे काही पैसे काढण्याचे दावे आता फक्त तीन दिवसांत निकाली काढले जातील. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाने वैद्यकीय, शिक्षण, विवाह आणि गृहनिर्माण उद्देशांसाठी आगाऊ दाव्यांसाठी ऑटो-मोड सेटलमेंट सुरू केले आहे.

पीएफचे पैसे कधी काढता येतात

जर एखाद्या कर्मचाऱयाला नोकरी गमवावी लागली असेल तर ती व्यक्ती एक महिन्यानंतर पीएफ खात्यातून 75 टक्के पैसे काढू शकते. याद्वारे ती व्यक्ती बेरोजगारीच्या काळात त्याच्या गरजा पूर्ण करू शकते. तसेच पीएफमध्ये जमा केलेली उर्वरित 25 टक्के रक्कम नोकरी सोडल्यानंतर दोन महिन्यांनी त्याला काढता येते. देशभरात कोटय़ावधी पीएफचे सदस्य आहेत.

2020 पासून सुविधा सुरू होती

ईपीएफओने कोरोनामध्ये 2020 मध्ये प्रथमच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत आगाऊ पैसे काढण्याची सुविधा दिली होती. याअंतर्गत, कर्मचारी पीएफ खात्यात जमा केलेल्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या 75 टक्के किंवा त्याच्या पीएफ खात्यातील शिल्लक 75 टक्क्यांपर्यंतची रक्कम काढू शकत होता.