अंधेरीत कांदळवनाची कत्तल करून भूखंड हडप

अंधेरी येथील लोखंडवाला बॅक रोड परिसरातील सुमारे 350 एकर जागेवरील कांदळवनाची कत्तल करत भराव टाकून हा भूखंड हडप करण्यात आला आहे. कांदळवनाची कत्तल, वृक्षतोड करून, सीआरझेड, बफर झोनचे उल्लंघन करून हा भराव टाकण्यात आला आहे. 350 एकरवर सुमारे 6 ते 6.50 फुटांची जाड भिंतही बांधण्यात आली आहे. पर्यावरण नियमांचे हे उल्लंघन असून हा भराव, ही भिंत काढून टाकावी आणि हा प्रकार करणाऱ्यावर एमपीडीए कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार अॅड. अनिल परब यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारकडे केली.

दरम्यान, याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली जाईल तसेच प्रत्यक्ष या ठिकाणी जाऊन मी, वनमंत्री, मुंबई उपनगराचे पालकमंत्री तसेच इतर सदस्य पाहणी करू. त्यानंतर योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.