
हिंदुस्थानात अवघ्या काही महिन्यांत लॅपटॉप आणि कॉम्प्युटर (डेस्कटॉप) च्या किमतीत तब्बल 35 टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. लॅपटॉप आणि डेस्कटॉपसाठी अत्यावश्यक असलेल्या प्रोसेसर व ग्राफिक्स कार्ड (जीपीयू) च्या किमती वाढल्याने लॅपटॉप आणि डेस्कटॉप बनवणाऱ्या कंपन्या किमतीत 35 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शक्यता आहे, अशी माहिती एका अहवालातून वर्तवण्यात आली आहे.
लॅपटॉप आणि कॉम्प्युटरला लागणाऱ्या रॅमच्या किमती आधीच अडीच ते तीन पटींनी वाढल्या आहेत. यामुळे लॅपटॉप आणि डेस्कटॉपच्या किमतीत आतापर्यंत 10 ते 12 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत 8 ते 10 टक्के वाढ होण्याचा अंदाज असून पुढील काही महिन्यांत यात आणखी 10 टक्के वाढ होईल. गेल्या काही महिन्यांपासून सामान्य लॅपटॉपसाठी वापरले जाणारे भाग महाग झाले आहेत. ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुज’मध्ये सुरू असलेल्या तणावामुळे भविष्यात संकट आणखी वाढू शकते. लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या किमती 2027 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत कमी होतील अशी शक्यता दिसत नाही, असे जाणकारांचे मत आहे. सध्या जे लॅपटॉप 30 ते 35 हजार रुपयांना मिळतात. त्या लॅपटॉपची किंमत काही दिवसांत 45 हजार रुपयांपर्यंत जाईल.


























































