बिहारमध्ये विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, बीपीएससी उमेदवार मागण्यांसाठी आक्रमक

‘सब का साथ सब का विकास’ अशी घोषणा देत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने दडपशाहीचा कारभार सुरू केला आहे. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पाटणा येथे बिहार लोकसेवा आयोगाच्या (बीपीएससी) कार्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आज पोलिसांनी लाठीहल्ला केला. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले.

बिहार लोकसेवा आयोगाची 70 वी प्राथमिक परीक्षा येत्या 13 डिसेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेतील सामान्यीकरण आणि बहुपर्यायी प्रश्नाच्या संचाला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. याला विरोध करण्यासाठी शेकडो विद्यार्थी बीपीएससीच्या कार्यालयाबाहेर जमा झाले होते. आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी बीपीएससी अध्यक्षांना भेटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला. दरम्यान, सामान्यीकरण लागू होण्याच्या वृत्ताचे बीपीएससीने खंडन केले आहे. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात असून सामान्यीकरण प्रक्रिया अवलंबण्याचा कोणताही प्रस्ताव नव्हता, असे बीपीएससीने म्हटले आहे.

नोकरी मांगो तो मिलेंगी लाठी…

पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर झालेल्या या लाठी हल्ल्याचा ‘मोदी की गॅरंटी, नोकरी मांगो तो मिलेंगी लाठी’ अशा शब्दांत काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला. तर तुम्ही निवडणुकांमध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या मतांवर निवडून येता त्याच विद्यार्थ्यांवर आज तुम्ही लाठीचार्ज करताय हा कसला न्याय? असा सवाल बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी सरकारला विचारला.