
सुधारणांच्या नावाखाली कामगार कायदे म्हणजेच कामगार संहितासह जनविरोधी आर्थिक धोरणे राबविण्याचा सरकारचा घाट हाणून पाडण्यासाठी येत्या 9 जुलै रोजी देशभरातील सर्व संघटित आणि असंघटीत क्षेत्रातील संघटनांच्या राष्ट्रीय समन्वय समितीने राष्ट्रव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपात AIBEA या लढावू बँक कर्मचारी संघटनेने सहभाग दर्शवल्याने, एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून हा संप पूर्ण ताकदीने बँक कर्मचाऱ्यांनी यशस्वी करावा, असे आवाहन बँक कर्मचाऱ्यांचे नेते कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी केले.
लातूर येथील संघटना कार्यालयात आयोजित सभेत कॉ. धनंजय कुलकर्णी बोलत होते. सुधारणांच्या नावाखाली आज नोकऱ्यांचे कंत्राटीकरण घडवून आणले जात आहे. विमा क्षेत्रात शंभर टक्के परकीय गुंतवणुकीला अनुमती देऊन एलआयसीसारख्या विमा कंपन्यांचा खाजगीकरणाचा घाट घातला जात आहे. मागील अनेक वर्षापासून सार्वजनिक क्षेत्रामध्ये आवश्यक त्या प्रमाणात कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची भरती केली जात नाही. सामान्य लोकांचा पैसा मोठ्या उद्योगपतींना कर्जामध्ये मोठी सूट देण्याकरता वापरला जात आहे. नव्या कामगार संहितेच्या माध्यमातून कामगारांच्या हातात पुन्हा बेड्या घातल्या जात आहेत.
आपल्या कष्टातून राष्ट्र उभारणीमध्ये योगदान देणाऱ्या कामगारांना जुन्या पेन्शनऐवजी नवीन पेन्शन लागू केली. सुधारणांच्या नावाखाली कामगार संघटनांच्या हक्कावरती गदा आणली जात आहे. या सर्व जनविरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी आज देशभरातील संघटित व असंघटित क्षेत्रातील मिळून दहा कोटी पेक्षा जास्त कामगार या संपामध्ये सहभागी आहेत. सरकारने संपाची गंभीर दखल घ्यावी अन्यथा भांडवलदार धार्जिण्या धोरणांना हाणून पाडण्यासाठी कामगारांना आपला लढा आणखी तीव्र करावा लागेल असा इशारा यावेळी बँक कर्मचाऱ्यांचे नेते कॉम्रेड धनंजय कुलकर्णी यांनी दिला.