
निलंगा तालुक्यातील हंचनाळ येथील शेतकरी अशोक भानुदास बिरादार (48) यांचा रविवारी (17 ऑगस्ट 2025) दुपारी शेतात तुटलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ग्रामस्थांनी महावितरणच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून वादळी पावसाने तालुक्यातील अनेक भागात उधळण केली होती. अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळले, तर काही ठिकाणी वीजवाहिनी जमिनीवर पडली होती. तरीदेखील महावितरणने अशा ठिकाणी वेळीच वीजपुरवठा बंद केला नाही, अशी गंभीर चूक झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रविवारी दुपारी अशोक भानुदास बिराजदार हे शेतात गेले होते. मात्र संध्याकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत. मोबाईलवर संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे घरच्यांनी शेताकडे धाव घेतली असता, तेथे त्यांच्या हातात विद्युत तार अडकलेली दिसली. ते बेशुद्धावस्थेत पडलेले आढळले. तातडीने त्यांना अंबुलगा बु येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शेतकरी बिरादार यांचा मृत्यू महावितरणच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे ग्रामस्थांचे ठाम म्हणणे आहे. वीजवाहिनी तुटून जमिनीवर पडली असूनही, त्या भागात वीजपुरवठा खंडित केला गेला नव्हता. “हे थेट दुर्लक्ष असून, याची जबाबदारी महावितरणचीच आहे,” असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावकऱ्यांनी घटनेनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला. अशा प्रकारे निष्काळजीपणामुळे निर्दोष शेतकऱ्याचा जीव गेला असून, मृतकाच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.