Latur News – किनगाव-अहमदपूर महामार्गावर धावत्या कारला आग, शिक्षकाचा होरपळून जागीच मृत्यू

किनगाव-अहमदपूर महामार्गावर गुरुवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. काजळ हिप्परगा परिसरातील ‘डुक्कर बंदा’ येथे धावत्या कारने भीषण पेट घेतला. या घटनेत अहमदपूर येथील सहशिक्षक माधव श्रीवाड यांचा गाडीतच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या काही दिवसांपूर्वीच अशाच एका कार अपघातातून थोडक्यात बचावलेल्या श्रीवाड यांच्यावर आज त्याच महामार्गावर काळाने घाला घातला.

मिळालेल्या माहितीनुसार, सहशिक्षक माधव श्रीवाड हे आपल्या मारुती 800 कारने किनगावकडून अहमदपूरच्या दिशेने येत होते. सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास काजळ हिप्परगा शिवारात त्यांची कार आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यामुळे कार जोरात डिव्हायडरला जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की, काही क्षणातच कारने पेट घेतला.

कारने पेट घेताच आगीचा मोठा लोळ उठला. आगीची तीव्रता एवढी प्रचंड होती की श्रीवाड यांना गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याची साधी संधीही मिळाली नाही. भरदिवसा महामार्गावर कार आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाली होती. हे विदारक दृश्य पाहून रस्त्यावरील प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र आगीच्या तीव्रतेमुळे कोणालाही जवळ जाता आले नाही.

माधव श्रीवाड हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपदेव हिप्परगा (ता. अहमदपूर) येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच अहमदपूर शहरातील टेंभुर्णी रोडवर त्यांचे पवन किराणा स्टोअर्स होते. त्यांच्या अपघाती निधनामुळे अहमदपूर शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.