
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांनी ऐन गर्दीच्या वेळी गुरुवारी केलेल्या आंदोलनाचा फटका असंख्य प्रवाशांना बसला असून या गोंधळानंतर सुटलेल्या लोकलने पाच जणांना उडवले. यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत एका वकिलाने हायकोर्टाला याबाबत पत्र लिहिले आहे.
मुंब्रा रेल्वे अपघातप्रकरणी अयोग्य अहवालाच्या आधारावर मध्य रेल्वेच्या दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन केले. त्याचा प्रचंड मनःस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला. तर दोघांचा अपघातामुळे बळी गेला असून तीन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणाची न्यायालयाने स्वतःहून ‘स्युमोटो’ दखल घ्यावी, न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी करत अॅड. अटलबिहारी दुबे यांनी हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांना पत्र लिहिले आहे.




























































