
वर्षानुवर्षे स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) ठाण मांडून बसलेल्या काही मोजक्या अंमलदारांच्या ‘मक्तेदारी’ला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ‘हुजरेगिरी’ आणि ‘राजकीय आश्रय’वर आधारित ही यंत्रणा उद्ध्वस्त करत नव्या 39 अंमलदारांची नियुक्ती केली. गेल्या चार-पाच वर्षांत एलसीबीसाठी नवीन अंमलदारांची नियुक्ती झाली नव्हती.
यापूर्वी एलसीबीचा कारभार प्रामुख्याने संलग्न अंमलदारांच्या आधारेच सुरू होता. मात्र, ही यंत्रणा अनेकदा वादग्रस्त ठरली. बदली होऊनही काही अंमलदार वर्षानुवर्षे त्याच ठिकाणी कार्यरत होते, तर काहींनी वरिष्ठांची ‘खुशामत’ करून आपली जागा पक्की केली होती. परिणामी, एलसीबी ठराविक गटाचे ‘अड्डे’ म्हणूनच ओळखले जाऊ लागले होते. पूर्वी वाढता राजकीय हस्तक्षेप आणि इच्छुकांची प्रचंड गर्दी पाहाता तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी एलसीबीमध्ये कोणतीही थेट नियुक्ती केली नव्हती. त्याऐवजी, सायबर पोलीस ठाण्यातील 18 ते 20 अंमलदारांना एलसीबीसाठी संलग्न काम करण्याचे आदेश दिले होते. काही पोलीस ठाण्यांत नियुक्तीला असलेल्या अंमलदारांना संलग्न करण्यात आले होते. हे अंमलदार गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून एलसीबीचे काम बजावत होते. त्यांची तपासकौशल्ये आणि कामगिरी लक्षात घेऊनच यावेळी त्यांना थेट एलसीबीमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे.
एलसीबीमध्ये नियुक्त झालेल्या 39 अंमलदारांमध्ये – बिरप्पा करमल, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळू खेडकर, गणेश धोत्रे, शाहीद शेख, अमृत आढाव, सुनील मालणकर, रमिझराजा आतार, भगवान थोरात, बाळासाहेब गुंजाळ, गणेश लोंढे, विष्णू भागवत, भीमराज खर्से, राहुल द्वारके, गणेश लबडे, हृदय घोडके, रमेश गांगर्डे, सुवर्णा गोडसे, सुयोग सुपेकर, रिचर्ड गायकवाड, अमोल आजबे, सुनील पवार, विजय पवार, शामसुंदर जाधव, सतीश भवर, सोनल भागवत, राहुल डोके, वंदना मोढवे, प्रकाश मांडगे, मनोज साखरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, योगेश कर्डिले, शामसुंदर गुजर, चिमा काळे व सोमनाथ झांबरे यांचा समावेश आहे.


























































