पालिकेच्या 2700 कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या मागणीला यश

मुंबई महापालिकेतील 5 मे 2008 पूर्वी भरतीप्रक्रिया सुरू झालेल्या 2700 कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शन योजनेत समावेश करण्यास पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज मान्यता दिली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे आभार मानले आहेत.

राज्य शासनाने 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरती, जाहिरात, अधिसूचना निर्गमित झालेल्या व 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेतील ज्या कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया 5 मे 2008 पूर्वी सुरू झाली होती व ते सदर तारखेनंतर सेवेत दाखल झाले अशांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केली होती.

 पालिकेने जुनी पेन्शन योजना बंद करताना काढलेल्या परिपत्रकात राज्य शासन त्यांच्या या योजनेत वेळोवेळी ज्या सुधारणा करेल त्याच धर्तीवर महापालिकेत या योजनेत बदल करण्यात येतील असे म्हटले होते.

n म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी महापालिका आयुक्तांना या मागणीबाबत निवेदन दिले होते. त्याअनुषंगाने शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी पुढाकार घेऊन आयुक्तांना विनंती केल्यामुळे आज निर्णायक बैठक झाल्याची माहिती बापेरकर यांनी दिली. एलएसजीडी व एलजीएस अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या लिपिकीय संवर्ग व निरीक्षकांची बंद करण्यात येत असलेली अतिरिक्त वेतनवाढ चालू ठेवण्यासाठी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासनदेखील या बैठकीत पालिका आयुक्तांनी दिले.