बिबटय़ा दिसताच खर्डीच्या वनाधिकाऱयांनी ठोकली धूम

834

शेतकऱयासह दोघे जखमी

शेतकऱयाच्या बकऱ्या फस्त करणाऱया  बिबटय़ाचा मागोवा घेणे खर्डीच्या वनाधिकाऱयांच्या जिवावर बेतले असते. पायाच्या ठशांचा मागमूस काढत जंगलात गेलेले वनपरिमंडळ अधिकारी  गायकवाड यांना अचानक दोन बिबटय़ांचे दर्शन झाले. साक्षात मृत्यूच समोर उभा ठाकल्याने भंबेरी उडालेल्या या अधिकाऱयांनी शेतकऱयासह धूम ठोकली. यात दोघेही जखमी झाले असून गावकऱयांमध्ये दहशत पसरली आहे.

खर्डी येथील फय्याज शेख यांच्या अजनुप-शिरोळ येथील बकरीच्या फार्मवरील दोन बकऱया व तीन पिलांचा दोन बिबटय़ांनी फडशा पाडला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिरोळचे वनपरिमंडळ अधिकारी  गायकवाड यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्याचवेळी शेख यांना सोबत घेऊन पायांच्या ठशांचा मागोवा घेत जंगलात बिबटय़ाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जंगलात पाहणी करताना, अचानक समोर बिबटय़ा दिसल्याने दोघांची धावपळ उडाली. त्यांनी स्वतःचा जीव वाचवून गावाच्या दिशेने धूम ठोकली. यात फय्याज शेख व विजय गायकवाड जखमी झाले आहेत. त्यानंतर फार्म हाऊसवरील सर्व बकऱया हलविण्यात आल्या आहेत. शेतावर किंवा सकाळी, सायंकाळी  एकटय़ाने फिरायला जाऊ नये, रात्री घरासमोरील लाइट सुरू ठेवावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

बिबटय़ा दिसून आला असून वनविभाग कर्मचाऱयांची गाडीने गस्त सुरू आहे. वरिष्ठांना अहवाल पाठवला असून त्यांच्या मार्गदर्शनात पुढील कार्यवाही करण्यात येईल.

विजय गायकवाड, वनपरिमंडळ अधिकारी.

आपली प्रतिक्रिया द्या