18 वर्षाच्या तरुणावर बिबट्याचा हल्ला, तरुणाने दोन हात करत बिबट्यालाच केले ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात एका 18 वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याने विलक्षण धैर्य दाखवत बिबट्याशी झुंज देऊन त्याला ठार मारल्याची घटना समोर आली आहे. जीवावर बेतलेल्या या हल्ल्यातही न घाबरता या तरुणाने केवळ हातांच्या जोरावर आणि दगडांच्या सहाय्याने बिबट्याचा मुकाबला केला.

तीन वर्षांचा बिबट्या पर्वेश शर्मा या तरुणावर सोमवारी सकाळी हल्ला करून झेपावला. पर्वेश दूध आणण्यासाठी बाहेर गेला असताना ही घटना घडली. अचानक झालेल्या हल्ल्यानंतरही त्याने धीर न सोडता बिबट्याशी झुंज देण्याचा निर्णय घेतला.

सुमारे 10 मिनिटे हा जीवघेणा संघर्ष सुरू होता. बिबट्या वारंवार त्याच्या मानेवर झेपावण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पर्वेशला माहिती होते की बिबट्या प्रामुख्याने मानेवर हल्ला करतो. त्यामुळे प्रत्येक वेळी बिबट्या झेपावला की त्याने आपल्या हातांनी त्याचे जबडे रोखले आणि त्याला मानेपर्यंत पोहोचू दिले नाही. मदतीसाठी तो सतत ओरडतही होता.

पर्वेशने सांगितले की, “मी बिबट्याच्या खालच्या जबड्याची कातडी पकडून खाली ओढत होतो आणि त्याचा वरचा जबडा रोखून धरत होतो.” दरम्यान, हाताला लागेल ते दगड आणि खडे उचलून त्याने बिबट्याच्या डोक्यावर प्रहार केले. अखेरीस या झुंजीत बिबट्याचा मृत्यू झाला. या घटनेत पर्वेश जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी आर्की रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले.

या धाडसी कृत्याबद्दल वन विभागाने पर्वेश शर्मा याला तातडीची मदत म्हणून 5,000 रुपयांचे बक्षीस दिले आहे.