जालन्यातील रुई येथील शेतात बिबट्याने पाडला गाईचा फडशा, २० दिवसांत दुसरी घटना; परिसरात भीतीचे वातावरण

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रुई परिसरात बिबट्याचे वाढते आतंकामुळे ग्रामस्थ आणि शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोठ्यात बांधलेल्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करुन तिचा फडशा पडल्याची घटना आज ४ डिसेंबर रोजी उघडकीस आली आहे. दरम्यान ऊस तोंडीमुळे ऊसात लंपलेले बिबटे व इतर प्राणी ऊस बाहेर पडत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

रुई येथील शेतकरी पंढरीनाथ प्रभाकर राजगुरू यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करून तिचा फडशा पाडल्याची घटना आज ४ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे, गेल्या वीस दिवसांत बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना असल्याने भीतीचे सावट अधिकच गडद झाले आहे. नेहमीप्रमाणे गोठ्यात बांधलेल्या कालवडीच्या दिशेने पहाटेच्या सुमारास मोठा आवाज आल्याचे कुटुंबीयांच्या कानावर गेले. लगेच शेतात धाव घेतली असता कालवडीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. मानेला आणि अंगावर आढळलेल्या खोल जखमा पाहता हा बिबट्याचाच हल्ला असल्याचे स्पष्ट झाले.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी वनपाल बी. एम. पाटील,वनरक्षक कैलास कदम,वनसेवक शेषराव राठोड, संतोष राठोड, पशु वैद्यकीय अधिकारी सिद्दीकी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेहाची तपासणी करण्यात आली. गावातील ग्रामस्थांच्या मते, केवळ वीस दिवसांपूर्वी गावाच्या दुसर्‍या टोकाला गाईवर बिबट्याने हल्ला केला होता. त्यानंतर वनविभागाने गस्त वाढवण्याचे आश्वासन दिले होते.मात्र पुन्हा हल्ला झाल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप व भीती दोन्ही वाढल्या आहेत. रात्री तर दिवसाही शेतात जाणे धोकादायक बनले असून पाळीव जनावरांना सांभाळणे कठीण होत आहे.

दरम्यान, वनविभागाच्या अधिकार्‍यांनी माहिती दिली की, रुई परिसरात पिंजरा लावण्याची तयारी सुरू असून,बिबट्याचा शोध घेण्यासाठी पथक नियुक्त केले जाणार आहे. अंबड तालुक्यात सध्या ऊस तोडणी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने बिबट्या आणि बिबट्यासदृश प्राणी पूर्वी लपून बसत असलेल्या उसाच्या शेतांपासून बाहेर येत असल्याचेही त्यांनी सांगितले. लपण्यासाठी जागा कमी झाल्याने हे प्राणी अनेक ठिकाणी नजरेस पडत असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

वनविभागाने शेतकर्‍यांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. शेतात एकटे जाणे टाळावे, शेतात जाताना आवाज करावा, घुंगराची काठी वापरावी, वाकून काम करू नये व नेहमी दक्ष राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.‘ग्रामस्थांनी काळजी घेतली तर अनर्थ टाळता येऊ शकतो,असेही विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, ग्रामस्थांनी वनविभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.