अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुरडीला बिबटय़ाने उचलून नेले, खारे कर्जुने येथील घटनेने घबराट

तालुक्यात बिबटय़ांचा वावर मोठय़ा प्रमाणावर वाढला असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल कामरगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटय़ाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच झाला. आज सायंकाळी घरासमोर खेळत असलेल्या पाच वर्षांच्या चिमुरडीला बिबटय़ाने उचलून नेल्याची घटना खारे कर्जुने गावात घडली. या घटनेमुळे गावासह तालुक्यात घबराट पसरली आहे.

रियांका सुनील पवार (वय 5, रा. खारे कर्जुने, ता. अहिल्यानगर) असे बिबटय़ाने उचलून नेलेल्या चिमुरडीचे नाव आहे.

खारे कर्जुने येथे काही कुटुंबे शेतमजूर म्हणून शेतावर वस्ती करून राहतात. थंडी वाढल्याने आज सायंकाळी कुटुंबातील सदस्य शेकोटीभोवती बसले होते. त्यावेळी रियांका पवार ही मुलगी घरासमोर खेळत होती. यावेळी शेजारी असलेल्या तुरीच्या शेतातून अचानक आलेल्या बिबटय़ाने रियांकाला उचलले आणि धूम ठोकली.

या घटनेने वस्तीवर एकच गोंधळ उडाला. घरच्यांनी आरडाओरड करत बिबटय़ाचा पाठलाग केला. मात्र, काही क्षणात रियांकाला घेऊन बिबटय़ा नजरेआड झाला. घटनास्थळी गावकऱयांची मोठी गर्दी जमली. पोलीस आणि वन विभागाचे अधिकारीही तातडीने दाखल झाले. यानंतर  गावकरी आणि वन अधिकारी रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते.

बिबटय़ाच्या हल्ल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. बिबटय़ांच्या वाढत्या वावरावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी गावकऱयांनी केली आहे.